esakal | लॉकडाउनचा फटका, गणेश मूर्तिकार अडचणीत
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशमूर्तींची रंगरंगोटी करताना मूर्तिकार.

दिवाळीनंतर मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरवात होते. यासाठी प्रत्येक मूर्तिकारांकडे किमान १० ते १५ जणांना रोजगार मिळतो. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक व्यापारी गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदरच शहरातील मूर्तिकारांकडे गणेशमूर्तींची बुकिंग करतात. यंदा आतापर्यंत किमान ५० टक्के बुकिंग होणे अपेक्षित होते; परंतु लॉकडाउनमुळे एकाही व्यापाऱ्याने बुकिंग केली नसल्याचे मूर्तिकाराने सांगितले.

लॉकडाउनचा फटका, गणेश मूर्तिकार अडचणीत

sakal_logo
By
राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाउनचा फटका गणेशमूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकार व कारागिरांना बसला आहे. यंदा घरगुती गणेशमूर्तींची निर्मिती केवळ ५० टक्क्यांपर्यंतच होणार असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. गणेशोत्सव अडीच महिन्यांवर आला आहे. दरवर्षी आतापर्यंत गणेशमूर्तींची व्यापाऱ्यांकडून ५० टक्के बुकिंग केली जाते; मात्र यंदा आतापर्यंत एकाही व्यापाऱ्याने बुकिंग केली नसल्याने या मूर्तिकारांचे लक्ष बुकिंगकडे लागले आहे.

शहरात घरगुती गणेशमूर्ती तयार करणाऱ्यांची संख्या ७० च्या जवळपास आहे. दिवाळीनंतर मूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरवात होते. यासाठी प्रत्येक मूर्तिकारांकडे किमान १० ते १५ जणांना रोजगार मिळतो. तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक व्यापारी गणेशोत्सवाच्या तीन महिने अगोदरच शहरातील मूर्तिकारांकडे गणेशमूर्तींची बुकिंग करतात. यंदा आतापर्यंत किमान ५० टक्के बुकिंग होणे अपेक्षित होते; परंतु लॉकडाउनमुळे एकाही व्यापाऱ्याने बुकिंग केली नसल्याचे मूर्तिकाराने सांगितले.

हे ही वाचा : सात दिवसांची तान्हुली ममस्पर्शाला मुकली..कोरोनाबाधित बाळंतणीचा घाटीत मृत्यू 

लॉकडाउन सुरू होताच मूर्तिकारांनी कारागिरांऐवजी कुटुंबातील व्यक्तींच्या साह्याने घरगुती गणेशमूर्ती तयार करण्याचे काम सुरू ठेवले; परंतु तुलनेत मूर्तींची संख्याही घटणार आहे. गणेशमूर्ती तयार करण्याच्या साहित्यांसाठी अनेक मूर्तिकारांनी लाखो रुपयांचे भांडवल गुंतविले आहे. यंदा ही गुंतवणूक निघून काही प्रमाणातच नफा मिळण्याची अपेक्षा आहे. 

शहरातील एका-एका मूर्तिकारांकडून दरवर्षी किमान सात ते आठ हजार घरगुती गणेशमूर्ती व्यापारी घेऊन जातात. त्यादृष्टीने मूर्तिकार तयारी करीत आहेत; परंतु लॉकडाउनमुळे अद्यापपर्यंत मागणी नोंदविण्यासाठी व्यापारी आले नाहीत. त्यामुळे मूर्तींना यंदा किती उठाव राहणार, याबाबत मूर्तिकार संभ्रमात आहेत. 

हे ही वाचा : अरे बाप रे ! मोरांना विष अन् नीलगायी, रानडुकरांना देतात शॉक ! 

रंगांचे दर वाढले 
गणेशमूर्तीच्या रंगरंगोटीसाठी विविध रंगांचा वापर केला जातो. त्यामुळे मूर्ती अधिक आकर्षित होते; परंतु यंदा रंगांचे दरही ३० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड मूर्तिकारांना बसला आहे. 

दरवर्षी आतापर्यंत विविध राज्यांतील व्यापाऱ्यांकडून किमान ५० टक्के गणेशमूर्ती खरेदीसाठी बुकिंग केली जाते; परंतु यंदा लॉकडाउन असल्यामुळे व्यापारी आले नाहीत. फोनवरूनही व्यापाऱ्यांनी बुकिंग केलेली नाही. यंदा तयार होणाऱ्या घरगुती मूर्तींची संख्याही ५० ते ५५ टक्केच राहणार आहे. 
- रवींद्र रामचंद्र भांगे, मूर्तिकार, उस्मानाबाद.