उस्मानाबाद : मृत्यूच्या नऊ तासानंतर तो आला पॉझिटीव्ह

File photo
File photo

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयातून मंगळवारी (ता. २३) पाठविण्यात आलेल्या सहा स्वॅबपैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. निलंगा तालुक्यातील औंढा येथील व्यक्तीवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने बुधवारी (ता. २४) सकाळी साडेदहाच्या सुमारास लातूरला उपचाराला नेताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रात्री अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खासगी रुग्णालयात संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाइनच्या सूचना उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

मृत व्यक्ती मूळचा औंढा (ता. निलंगा) येथील रहिवासी आहे. तो हैदराबाद येथे ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करायचा. पाच जूनला गावाकडे आला होता. १४ जूनला छोटेखानी कार्यक्रमात मुलीचे लग्न झाले होते. त्या व्यक्तीची सासुरवाडी बालकुंदा आहे. तो चार-पाच दिवसांपासून आजारी असल्याने गावातील एका डॉक्टराला दाखवले. तेथून मंगळवारी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला. त्याला न्यूमोनिया असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

कृत्रिम श्वासोच्छवासाला प्रतिसाद मिळत नसल्याने बुधवारी सकाळी लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल मृत्यूच्या नऊ तासांनंतर आल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात आहे. तसे पत्र रुग्णालयाला देण्यात आले असून त्याचा खुलासा प्राप्त होईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी सांगितली.

नातेवाइकांनी त्या व्यक्तीस खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची लेखी माहिती सरकारी रुग्णालयाकडे कळविण्यात आली नव्हती, असे सरकारी रुग्णालय प्रशासन म्हणते. पण स्वॅब घेण्यासाठी सरकारी रुग्णालयाचे कर्मचारी गेले होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी नेले जात असतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला.

कोरोनासारखी महामारी सुरू असताना खासगी-सरकारीमध्ये समन्वय असता तर अहवाल येईपर्यंत मृतदेह सरकारी रुग्णालयातील शीतगृहात ठेवता आला असता. जेणेकरून अंत्यविधीसाठी गेलेल्या नातेवाइकांमध्ये सध्या सुरू असलेली धाकधूक थांबली असती. दरम्यान, अंत्यविधीसाठी तालुक्यातील नाईचाकूर येथील गेलेल्या सात, औंढा येथील १७ तर कासार बालकुंदा येथील १० नातेवाइकांना क्वारंटाइन व्हावे लागले. 

यासंदर्भात आरोग्य प्रशासनाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर खासगी रुग्णालयात संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. आणखी दोन-तीन दिवसांनंतर संशयितांची तपासणी होईल. रुग्णालयात उपचारासाठी असलेले अन्य रुग्ण, डॉक्टर्स, कर्मचारी यांना तेथेच क्वारंटाइन राहण्याचे कळविण्यात आले असून या प्रकारात नेमके काय झाले, याबाबत चौकशी करण्याची सूचना जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिली आहे. 
- विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com