esakal | ग्रामपंचायत नारायण कॉलनी म्हणा...
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद : नारायण कॉलनीतील नागरिकांनी लावलेला फलक.

मूलभूत सोयीसुविधा नसल्याने उस्मानाबाद शहरातील नारायण कॉलनीत राहणारे रहिवासी वैतागले आहेत. अनेकवेळा सांगूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतापलेल्या नागरिकांनी आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी 'ग्रामपंचायत नारायण कॉलनी' असा फलक लावले आहे. 
...

ग्रामपंचायत नारायण कॉलनी म्हणा...

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : मूलभूत सोयीसुविधांअभावी गैरसोय होत असल्याने शहरातील काकडे प्लॉट परिसरातील नागरिकांनी "ग्रामपंचायत नारायण कॉलनी' असा फलक लावून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन महिन्यांपासून रस्ते व नाल्याचे काम थांबल्याने एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी असा फलक लावला आहे. तर दुसऱ्या बाजूला नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी मात्र प्रशासनाला दोष दिला असून, प्रस्ताव देऊनही प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने विकासकामे थांबली असल्याचे सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून नारायण कॉलनीमध्ये कोणत्याही प्रकारची कामे होत नसल्याच्या तक्रारी होत्या. लोकप्रतिनिधींनी तक्रारींची दखल घेत पाठपुरावा करून विकासकामासाठी निधी खेचून आणला. दीड कोटीच्या निधीतून रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. त्यानुसार प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्तावदेखील सादर करण्यात आले आहेत.

हेही वाचा : शेतकऱ्याने कोवळ्या मुलासह निवडला असा मार्ग, की...

तीन महिन्यांपासून कॉलनीतील नालीचे काम सुरू करण्यात आले होते. पण ते काम अर्धवट झाल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. हे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी वारंवार केली. मात्र त्याचा काहीच फायदा होत नसल्याने अखेर हे आंदोलन करण्याचा पवित्रा स्वीकारल्याचे दिसून येत आहे. कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळच नागरिकांनी "नारायण कॉलनीला ग्रामपंचायत तरी म्हणा' असा फलक लावून लक्ष वेधले. परिसरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत लोकप्रतिनिधी व प्रशासन विकासकामे पूर्ण करतील, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्‍त केली. तसेच यापुढे जनआंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन करणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला. 

हेही वाचा : तिच्या तगाद्यामुळे त्याने पिले विष आणि...


कॉलनीतील नगरसेवक अभिजित काकडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी विकासकामे दर्जेदार पद्धतीने होण्याची गरज असल्याचे सांगून कामे अर्धवट असल्याने नागरिक आम्हाला लक्ष्य करीत असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असून, आम्हाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. अनेकवेळा पाठपुरावा करूनही काम होत नसल्याचे सांगून श्री. काकडे यांनी हतबलता व्यक्त केली. 

नगरपालिकेच्या अनेक कामांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात पडून आहेत. त्याला प्रशासकीय मान्यताच मिळत नसल्याने विकासकामे थांबली आहेत. नारायण कॉलनी येथील कामाबाबत मी स्वतः व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करून प्रस्ताव तयार केले आहेत. पण त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळत नसल्याने पुढील कार्यवाही करता येत नाही. 
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष 

loading image