युती अन्‌ आघाडीतही बंडखोरीची लागण

सयाजी शेळके
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

तुळजापूरच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष, युतीत दुरावा? 

उस्मानाबाद ः उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शुक्रवारी (ता. चार) युतीसह आघाडीला बंडखोरीची लागण झाली आहे. शिवाय भाजप-सेना युतीत फारसे सौख्य नसल्याचेच सध्यातरी चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी मात्र युती अभेद्य असल्याचे सांगत सारवासारव केली आहे.

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात युतीकडून कैलास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित झाली आहे. दरम्यान, सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे. तर आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडून संजय निंबाळकर यांची उमेदवारी अंतिम टप्प्यात निश्‍चित झाली. त्यामुळे सुरेश पाटील यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली आहे. परंड्यातही शिवसेनेत बंडखोरी झाली असून तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, तुळजापूरमध्ये कॉंग्रेसचे मधुकरराव चव्हाण आणि भाजपचे राणाजगजितसिंह पाटील यांच्यात लढत होत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला आहे. याशिवाय या सर्वांनाच वंचित बहुजन आघाडीचे अशोक जगदाळे यांचे आव्हान पेलावे लागणार आहे.

अर्ज भरण्यासाठी युतीमध्ये चांगलाच बेबनाव असल्याचे दोन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. तुळजापूरची जागा भाजपला सुटली असून राणाजगजितसिंह पाटील उमेदवार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे पदाधिकारी सोबत नसल्याचे सांगितले जात आहे. तर उस्मानाबादची जागा शिवसेनेला सुटली असून शहरातील भाजपचा एकही पदाधिकारी उमेदवारी अर्ज भरताना सोबत नव्हता. तर परंड्यातही प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा उमेदवारी अर्ज भरताना केवळ संजय गाढवे यांची उपस्थिती होती. त्यामुळे युतीत दुरावा आहे काय? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. 

 

जिल्ह्यासह राज्यात युती अभेद्य आहे. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते कामाच्या निमित्ताने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या-त्या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे कार्यकर्ते नसतील. पण, युती अभेद्य आहे. युतीतील वरिष्ठ नेते एकोप्याने काम करीत आहेत. 
- प्रा. डॉ. तानाजी सावंत, जलसंधारणमंत्री 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about politics