Vidhan Sabha 2019 : टपाली मतपत्रिकेत नावे नसल्याने गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कागदपत्रे उशिरा सादर केल्याचा दावा 

औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या टपाली (पोस्टल) मतदारयादीत नावनोंदणीसाठी उशीर झाल्याने अनेकांना मतपत्रिका मिळू शकल्या नाहीत. यामुळे शनिवारी (ता. 12) या प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली. 
दरम्यान, या गोंधळाच्या स्थितीमुळे अनेकांना मतदानाच्या पहिल्या दिवशी हक्‍क बजावता आला नाही, असा आरोपही यावेळी करण्यात आला. 

निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना पहिल्या प्रशिक्षणादरम्यान फॉर्म नंबर 12 दिला जातो. त्यासोबत ओळखपत्र जोडून ते संबंधितांकडे सादर करावे लागते. अशा कर्मचाऱ्यांना टपालाद्वारे मतदान करण्याची सुविधा आहे. जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांसह अन्य कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्या मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार ते ता. 23 रोजी सायंकाळपर्यंत पोस्टाने मतपत्रिका पाठवू शकतात. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात शनिवारी (ता. 12) सकाळी मतदानप्रक्रिया आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मतदानासाठी जवळपास चारशे पोलिस मतदार उपस्थित होते.

मात्र, काही जणांची नावे नव्हती, तर काहींना मतपत्रिका कमी पडल्याने माघारी परतावे लागले. त्यामुळे केवळ 115 पोलिस कर्मचाऱ्यांनी मतदान केले. काही मतदारांची नावे यादीत नसल्याने गोंधळ उडाला. नियोजनातील त्रुटी दूर करून तत्काळ मतदान घ्या, अशी मागणी पोलिसांनी केली. यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि मतदारांत वाद झाला. दुपारनंतर दोन वाजता अधिक मतपत्रिका मागवून मतदान घेण्यात आले. 
 
 

ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे, अशांसाठी टपाली मतदान घेतले जात आहे. पहिल्या प्रशिक्षणाच्या ऑर्डरसोबतच सर्वांना फॉर्म नंबर 12 आणि ओळखपत्र मागितले होते. काही जणांनी दोन दिवसांपूर्वी आणून दिले. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची त्यात नावे नसतील. तरीही कागदपत्रांच्या आधारावर जे कर्मचारी टपाल मतदानासाठी पात्र असतील, अशांना आम्ही घरपोच मतपत्रिका पाठविणार आहोत. त्यांना ता. 23 रोजी सायंकाळपर्यंत ती मतपत्रिका पोस्टाने पोचती करावी. गर्दीमुळे अडचण झाली असेल. मात्र, मतदानप्रक्रिया सुरळीत सुरू पार पडली. विशेष म्हणजे 97 टक्‍के कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. 
- डॉ. ज्ञानोबा बानापुरे, उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक अधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Postal ballot