महामार्गाच्या खड्ड्यासाठी ग्रामस्थांचे पोलिसांनाच साकडे

अनिल जमधडे
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाका 

औरंगाबाद, : माळीवाडा (ता. औरंगाबाद) गावाजवळील नाशिक- औरंगाबाद महामार्गावर खड्डेच खड्डे पडले आहेत. त्यामुळे संबंधीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पोलिस स्टाईलने पाठपुरावा करावा अशी मागणीच ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. 

माळीवाडा गावापासून जवळच समृद्धी महामार्ग व धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र कामामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर खड्‌डे पडले आहेत.

त्यामुळे येथून वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यामुळे महामार्गावर अपघाताची संख्या वाढली आहे. म्हणूनच गावातील सरपंच व ग्रामस्थांनी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण यांना निवेदन देऊन खड्डे बुजवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे पोलिस पद्धतीने पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. खड्डे लवकर न बुजवल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यावर संबंधीत विभागाकडे पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या माध्यमाने पाठपुरावा करण्याचे अश्‍वासन श्री. चव्हाण यांनी दिले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news about pwd