जिल्हाभरात सर्वदूर रिपरिप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

पावसाच्या सलग हजेरीने शेतकऱ्यांना दिलासा 

उस्मानाबाद ः जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांनंतर शेतातून पाणी बाहेर निघाल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे शहरातही पावसाने गुरुवारी (ता. 19) दमदार हजेरी लावल्याने शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती, तर अनेक भागांत पाणी साचले होते. 

यंदाच्या पावसाळ्यात दमदार पावसाने ओढ दिली होती. आतापर्यंत दररोज जेमतेम 10 ते 20 मिलिमीटर पाऊस होत असे. अशाच पावसाने सरासरी अडीचशेच्या पुढे गेली. त्यामुळे पाऊस चांगला झाल्याचे चित्र होते. ग्रामीण भागातही पावसाची अशीच स्थिती आहे. जिल्ह्याच्या काही भागात पिके चांगली आहेत. अशा ठिकाणी सातत्याने कमी-जास्त पडला आहे. त्यामुळे पिकांची वाढ चांगली झाली आहे. मात्र मोठा पाऊस नसल्याने कोणत्याही प्रकल्पात पाणी साचले नाही. तर काही भागात अत्यल्प पाऊस होता. आता बहुतांश भागात बुधवारपासून चांगला पाऊस होत आहे. गुरुवारी दुसऱ्या दिवशी सर्वदूर चांगला पाऊस झाला. 

18 मिलिमीटर पावसाची नोंद 
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 18 मिलिमीटर पाऊस झाला असून उमरगा तालुक्‍यात सर्वाधिक 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्‍यातील डाळिंब येथे 58, मुळज येथे 40 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्‍यातील मंगरूळ येथे 51 तर सलगरा येथे 46 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात कमी-जास्त पाऊस झाला असला तरी परंडा तालुक्‍यातील अनाळा, सोनारी येथे मात्र पावसाने उघडीप दिली होती. 

वाहतूक काही काळ ठप्प 
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी सायंकाळी तसेच गुरुवारीही शहरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने शहरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर अनेक ठिकाणच्या सखल भागांत पाणी साचले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about rain