परतीच्या पावसाने मांजरा खळखळू लागली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा 

कळंब (जि. उस्मानाबाद) : परतीच्या पावसाने तालुक्‍यात शुक्रवारी (ता.18) सायंकाळी सर्वच महसूल मंडळांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्‍यातील शिराढोण महसूल मंडळात तब्बल 70, तर कळंब महसूल मंडळात 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा अंदाज लक्षात घेऊन सोयाबीनची काढणी करून रब्बी पिके घेण्यासाठी शेतकरी जमिनीची मशागत करण्याच्या कामात व्यस्त होते. सहा महसूल मंडळांत परतीच्या पावसाने सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

पावसाळ्यातील संपूर्ण दिवस कोरडे गेले होते. रिमझिम पावसामुळे दमदार पाऊस होईल, याची अपेक्षा शेतकऱ्यांनी सोडली होती. परतीचा दमदार पाऊस होईल, असे हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजामुळे शेतकऱ्यांच्या पुन्हा अपेक्षा वाढल्या होत्या. परतीच्या पावसाने तालुक्‍यात सर्वदूर दमदार हजेरी लावल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. पावसाळ्यातील दिवस कोरडे गेल्यामुळे पाऊस न होण्याची शक्‍यता गृहीत धरून अनेक मजुरांचे स्थलांतर झाले. त्यामुळे मजुरांच्या टंचाईमुळे सोयाबीन काढणी लांबणीवर पडली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढले; पण शेतात तसेच ढिगारे लावून झाकून ठेवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

तालुक्‍यात सर्वच महसूल मंडळांत सर्वदूर पाऊस झाला. पावसामुळे शेतात पाणीच पाणी दिसून येत असून नद्या, नाले पाण्याने वाहत आहेत. हा पाऊस रब्बीसाठी उपयुक्त असल्याचे शेतकरी सांगत असून, पंधरा दिवस जमिनीचा वाफसा होणे कठीण आहे. दिवाळी झाल्यानंतरच रब्बी पेरणीच्या कामाला शेतकरी सुरवात करतील, असा अंदाज आहे. 

ऊस झाला उडवा 
दमदार पाऊस होईल या आशेपोटी अनेक शेतकऱ्यांनी गतवर्षीचा उसाचा खोडवा जोपासला आहे. अधूनमधून झालेल्या पावसामुळे उसाची चांगली स्थिती आहे. शुक्रवारी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्यामुळे उसाचे पीक आडवे झाल्याचे पाहावयास मिळत आहे. महसूल मडंळात नोंदला गेलेला पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे : शिराढोण 70, कळंब 66, इटकूर 61, येरमळा 47, गोविंदपूर 58, मोहा 35.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about rain