रागाने घराबाहेर, रात्रभर पाटपीट अन्‌ रस्त्यात सापडले देवदूत!

भगवंत सुरवसे
बुधवार, 4 डिसेंबर 2019

वडील रागावल्याने घराबाहेर पडलेल्या सतरावर्षीय मुलीची सजग नागरिकांनी समजूत काढली. एवढेच नव्हे तर तिला आर्थिक मदत करीत तिचे मतपरिवर्तन करुन सुखरुप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) : वडील रागावल्यामुळे नाराज होऊन रात्री घरातून बाहेर पडलेल्या सतरावर्षीय मुलीस सजग नागरिकांनी कुटुंबाकडे सुपूर्द केले. त्यासाठी अज्ञात कारचालक, येथील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी आदींसह अन्य काही नागरिकांनी पुढाकार घेतला. 

कारचालकाने केली मदत 
नळदुर्गपासून तीन किलोमीटरवरील लोहारा तालुक्‍यातील एका गावातील ही मुलगी वडील रागावल्यामुळे नाराज होऊन सोमवारी (ता. दोन) रात्री घराबाहेर पडली. रात्रभर पायपीट करून ती राष्ट्रीय महामार्गावरील जळकोट (ता. तुळजापूर) येथे पहाटेच्या सुमारास पोचली. तिने वाहनास हात दाखविल्यानंतर कुटुंबासह सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात कारचालकाने तिला कारमध्ये बसविले. तिची विचारपूस केली. भविष्यात संकटाचा सामना करावा लागू नये म्हणून तिची समजूत काढली व नळदुर्ग बसस्थानकावर पहाटे पाचला उतरविले. एवढेच नव्हे तर खर्चासाठी हजार रुपये दिले. 

हेही वाचा -नाराजीनाट्यानंतर पंकजा मुंडे बोलल्या, केला महत्वाचा खुलासा 

हेही वाचा - मोदींची ऑफर नाकारली! 

मुलीचे मतपरिवर्तन केले 
कारचालकाने येथील वृतपत्र विक्रेते भारत यादगिरे यांना माहिती दिली. पहाटेच्या सुमारास शहरातील नागरिक शिवाजी नाईक हे बसस्थानकात आले असता त्यांनी चौकशी केली. मुलगी पुण्याला जाणार असल्याचे सांगत होती. वडील कायम रागावत असल्याचेही ती सांगत होती. नाईक यांनी सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक विनायक अहंकारी यांना फोन करून याची माहिती दिली. थोड्या वेळात भारत यादगिरे, शिवाजी नाईक व विनायक अहंकारी यांनी या मुलीला विश्वासात घेऊन मतपरिवर्तन केले. मोबाईल नंबर घेऊन तिच्या वडिलांना माहिती दिली. मुलगी सुखरूप असून, लवकरच आपल्या घरी घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर अहंकारी यांनी मुलीला पाहुणचार करून लोहारा तालुक्‍यातील तिच्या गावातील घरी सोडले. घरी पोचताच मुलीने वडिलांना मिठी मारत अश्रूंना वाट करून दिली, असे अहंकारी यांनी सांगितले. या वेळी मुलीच्या कुटुंबीयांनी अहंकारी यांचे आभार मानले. अहंकारी यांनी मुलीसह तिच्या वडिलांची समजूत काढली. नळदुर्गला आल्यानंतर अहंकारी यांचा शहर पत्रकार संघाने सत्कार केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seventeen-year-old girl out of anger, Angels found in the road!