साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी नितीन तावडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली.

उस्मानाबाद : जानेवारीमध्ये शहरात होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी मराठवाडा साहित्य परिषदेचे उस्मानाबाद शाखाध्यक्ष नितीन तावडे यांची निवड करण्यात आली. तर प्रमुख कार्यवाहपदी रवींद्र केसकर, कोषाध्यक्ष माधव इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत मंडळाची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी रविवारी (ता. आठ) दुपारी तीन वाजता संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. शिक्षणतज्ज्ञ एम. डी. देशमुख यांनी स्वागताध्यक्ष पदासाठी नितीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, तर कोषाध्यक्षपदासाठी माधव इंगळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. ज्येष्ठ लेखिका तथा सातव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कमलताई नलावडे यांनी प्रस्तावास अनुमोदन दिले. माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनीही पदाधिकारी निवडीस समर्थन दिले. कार्यकारिणी सदस्यपदी प्राचार्य डॉ. अनार साळुंके, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, मीनाताई महामुनी, ज्येष्ठ कथाकार जयराज खुने, इलीयास पीरजादे, युवराज नळे, आशिष मोदाणी, राजेंद्र अत्रे, बालाजी तांबे, डॉ. अभय शहापूरकर, अग्निवेश शिंदे, श्रीकांत साखरे यांची निवड करण्यात आली.

उस्मानाबाद शहरासह परिसरातील विविध संस्था, संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांतून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण कटिबद्ध असून, राज्याच्या साहित्य आणि सांस्कृतिक इतिहासात मानदंड ठरेल असे दर्जात्मक संमेलन उस्मानाबादकरांच्या सहकार्यातून यशस्वी करू, असा मानस नवनियुक्त स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Sahitya Sammelan

फोटो गॅलरी