गुडघाभर चिखलातून विद्यार्थ्यांना करावी लागते ये-जा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

कोरेगाव येथील शाळा जिल्ह्यातील आयएसओ मानांकित शाळांपैकी एक आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवित दररोज शाळेला ये-जा करावी लागत आहे.

उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्‍यातील कोरेगाव येथील शाळा जिल्ह्यातील आयएसओ मानांकित शाळांपैकी एक आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या या शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवित दररोज शाळेला ये-जा करावी लागत आहे. 

गावापासून शाळेचे अंतर जवळपास एक किलोमीटर आहे. शाळेच्या आजूबाजूला जवळपास 50 घरांची वस्तीही आहे. रिमझिम पावसामुळे शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल होतो. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. गुडघाभर चिखलातून जवळपास एक किलोमीटरचा रस्ता पार करीत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. हा रस्ता शाळेच्या समोरून कोरेगाववाडीकडे जातो. कोरेगाववाडी शिवारात अनेक वीटभट्ट्या, खडी केंद्र आदी उद्योग आहेत. या उद्योगांच्या सर्व लहान-मोठी वाहनांची या रस्त्यावरून दिवसभर वर्दळ असते. त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेत, तसेच शाळा सुटण्याच्या वेळेत या रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना जोखीम पत्करावी लागते. रस्ता खूपच अरुंद असून, थोड्या पावसानेही चिखल होतो. संपूर्ण रस्त्यावर जवळपास गुडघाभर खोलवर खड्डे पडलेले आहेत.

गेली दोन वर्षे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना व वस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. अगदी लहान म्हणजेच पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांना तर पाऊस झाल्यानंतर शाळाच बुडवावी लागते. गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होण्याचे एक महत्त्वाचे कारण खराब रस्ता असल्याचे मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांनी सांगितले. गावातच सर्व सुविधांनी परिपूर्ण शाळा असून रस्त्याच्या कारणामुळे नाईलाजाने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतून काढावे लागते आहे. चिखल आणि मोठे खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना अतिशय त्रास होतो आणि अनेकदा लहान मुले या रस्त्यावरून जाताना खड्ड्यात पडतात. प्रशासन, लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी ही बाब लक्षात आणून दिली आहे. लेखी स्वरूपात निवेदन सादर करण्यात आले आहे. परंतु, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तात्पुरत्या दुरुस्तीची मलमपट्टी करण्यापेक्षा नवीनच रस्ता करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Student