सराफा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

लोहाऱ्यातील घटना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड 

लोहारा (जि.उस्मानाबाद) ः शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सराफा दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी उघडकीस आली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कानेगाव रस्त्यालगत मोहन पोतदार यांचे बालाजी ज्वेलर्स या नावाचे सोने-चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. श्री. पोतदार शुक्रवारी (ता. 20) रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. परंतु, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी सोन्याच्या दुकानाचे चायना गेट तोडून आतील शटर उचकटून दुकानातील रोख रकमेसह पाच लाख 80 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. यात दोन लाख 70 हजार रुपयांचे चांदीचे चैन, 90 हजारांची जोडवी, तीन किलो चांदीचे करदोडे, वाळे, पंचपाळ व अन्य दागिन्यांची मोड, तसेच चार हजार रोख रक्कम असा एकूण सुमारे पाच लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला. 

दरम्यान, मोहन पोतदार यांचे बंधू दयानंद पोतदार हे शनिवारी सकाळी दुकान उघडण्यास आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यावेळी श्री. पोतदार यांनी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक अनंतराव वाठोरे, पोलिस हवालदार सचिन शेवाळे, मनोज जगताप, अनिल बोदमवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटना गंभीर असल्याने पोलिसांनी उस्मानाबाद येथील श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. दुपारी श्वान व ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वानाच्या माध्यमातून पथकाने चोरट्यांचा सुगावा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, चोरट्याने कुठलाच पुरावा मागे शिल्लक ठेवला नसल्याने श्वान चौकातच घुटमळले. त्यामुळे पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नाही. या दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही चोरट्यांनी नासधूस केली. 
शहरातील मुख्य बाजारपेठीतील सोने, चांदीचे दुकान चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची माहिती शहरभर पसरली. त्यामुळे नागरिकांनी दुकानासमोर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, दुकानचालक मोहन पोतदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
17 सप्टेंबर रोजी काही अज्ञात तरुण शहरातातील सर्वच सोने-चांदीच्या दुकानांत संशयास्पद फिरत असल्याचे दुकानदारांच्या लक्षात आले होते. त्यामुळे शहरातील सराफ व्यापाऱ्यांनी बुधवारी (ता. 18) लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक चौरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संशयास्पद तरुण शहरात फिरत असल्याची माहिती दिली होती. परंतु, पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. रात्रीची गस्त वाढवून पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर ही चोरीची घटना घडली नसती, असे व्यापारी व नागरिकांचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about theft