काठी काढली, झाडही तोडले : नतदृष्ट तरुणाचे कृत्य

अतुल पाटील
रविवार, 22 सप्टेंबर 2019

औरंगाबादेतील एन. वन परिसरातील प्रकार

औरंगाबाद : ऊन, वारा, पाऊस सोसत गेल्या वर्षभरापासून डुलणारे पिंपळाचे झाड एका नतदृष्ट तरुणाच्या कृत्याने जायबंदी झाले आहे. रस्त्याने जाता-जाता उंच झाडाला आधार म्हणून बांधलेली काठी काढून नेत असताना त्याने झाडही तोडले. हा प्रकार शनिवारी (ता. 21) सायंकाळी सिडकोतील एन-एकच्या काळा गणपती मंदिरासमोरील हरीतपट्ट्यात घडला.

"ऑक्‍सिजन पॉकेट' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्र शासनाच्या "अमृत मिशन अभियाना'तून हरित क्षेत्र विकसित करण्यात येत आहे. या योजनेत औरंगाबादची निवड झाल्यानंतर शहरातील जळगाव रोडवरील हरीत पट्टा, पारिजातनगर, जालाननगर परिसरात सहा ते बारा फुटांची सुमारे साडेअकरा हजार झाडे लावली आहेत. "डेन्स फॉरेस्ट'च्या धर्तीवर ही वृक्षलागवड झाली आहे.

वर्षभरापूर्वी लावलेली झाडे या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी आणि वाहनधारकांच्या नजरेस भरत आहेत. एरव्ही होणाऱ्या वृक्षलागवड मोहिमांना अपवाद ठरणाऱ्या या योजनेचे लोकांकडूनही सातत्याने कौतुक होत असते. ऐन उन्हाच्या कडाक्‍यात झाडे वाचवण्यासाठी संबंधित कंपनीने मेहनत घेतली. मार्च 2019 नंतर याची काळजी महापालिकेतर्फे घेण्यात येत आहे.

वृक्षलागवडीतील मर केवळ दोन ते तीन टक्‍के वगळता सर्वच झाडे चांगली जगली आहेत; मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्या विकृत लोकांचे ती झाडे बळी ठरत आहेत. एसटीपी प्रकल्पातून शुद्ध केलेले पाणी, कचरा प्रक्रिया केंद्रातून तयार केलेले खत आणि नियमित खुरपणी करत केलेली स्वच्छता यामुळे ही वृक्षलागवड इतर मोहिमांपेक्षा वेगळी ठरली आहे.

केवळ काठीसाठी 25 झाडांचे नुकसान
जळगाव रोडच्या हरीतपट्ट्यात लावलेली झाडांना आधार म्हणून काठ्या बांधण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत झाडांच्या काठ्या काढून नेताना सुमारे 25 झाडे तुटली आहेत. अनेकांचे शेंडे तुटल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. लोकांनी मानसिकता बदलून सहकार्य करण्याची अपेक्षा महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी "सकाळ'कडे व्यक्‍त केली. प्रत्येक ठिकाणी महापालिका लक्ष देऊ शकत नाही. लोकांनी आणि वृक्षप्रेमींनीही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असेही ते म्हणाले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Tree