संबळला बळ देण्याचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 सप्टेंबर 2019

तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. महोत्सवाशी निगडित विविध घटकही तयारीला लागले आहेत. मूर्ती घडविण्यात कारागीर व्यस्त आहेत. पारंपरिक गोंधळी बांधवांनी संबळला बळ देण्याचे अर्थात त्यांची डागडुजी आणि नवनिर्मितीवर भर द्यायला सुरवात केली आहे. 

तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पद्धतींनी तयारी सुरू आहे. मंदिरात देवीच्या बारमाही धार्मिक विधीच्या वेळी आणि नवरात्रातील सर्वच धार्मिक विधीच्या वेळी संबळ या वाद्याची आवश्‍यकता असते. तुळजाभवानी मंदिरातील पारंपरिक गोंधळी बांधव संबळ वाद्याचा वापर करतात. मंदिरात असणारे बहुतांश संबळ लाकडी आहेत. याशिवाय लोखंडी, पितळी आणि काही ठिकाणी स्टीलचेही संबळ आहेत. वाजते त्याला पुड म्हणतात. कातड्यापासून पुड तयार करून लाकडी किंवा धातूच्या ढाचावर बसविले जाते. संबळाच्या खालच्या भागास (गोल भाग) कोळंब असेही म्हटले जाते. मंदिरात बहुतांश संबळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. आता नवीन पिढीसाठी फायबरचे संबळही तयार केले जात आहेत. तथापि, त्याचा वापर कमी प्रमाणात केला जातो.

संबळवादन महत्त्वाचे... 
तुळजाभवानी मंदिरात देवीच्या प्रत्येक धार्मिक कार्यक्रमास संबळ वाद्याला महत्त्व आहे. सकाळी आणि सायंकाळी देवीचे अभिषेक सुरू झाल्यानंतर संबळवादन सुरू होते. देवीचा अंगारा मिरवणूक होईपर्यंत ते चालते. देवीचा अंगारा मिरवणुकीत संबळसोबत असतेच. घटस्थापना, घटोत्थापन, छबिना, सीमोल्लंघन, शाकंभरी नवरात्र महोत्सवातही भोपे मंडळींच्या आरत्यांची मिरवणूक, भेंडोळी यांसह प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाच्या वेळेस संबळ असते. गायकवाड, मोरे, रसाळ, सुरवसे आदी घराण्यांतील मंडळी संबळ वाजवून तुळजाभवानी मातेची सेवा करतात. 

तुळजाभवानी मातेच्या नवरात्रासाठी संबळ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यंदा तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघनावेळी आठ ऑक्‍टोबरला 101 संबळ वाजविण्याचा संकल्प केला आहे. गोंधळी बांधवांसाठी पोशाखही केले आहेत. 
- राजाभाऊ गायकवाड, तुळजाभवानी मातेचे गोंधळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about Tuljapur