esakal | रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय

बोलून बातमी शोधा

तुळजापूर : तालुक्यातील खडकी, धोत्री येथील ग्रामस्थांनी सोलापूरकडे जाणारा रस्ता वडजीजवळ अडवला.

जिल्हाबंदीमुळे सोलापूरला जाता येत नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात दोन्ही जिल्ह्यांतील महसूल अधिकाऱ्यांमार्फत हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

रस्ता बंद झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर  (जि. उस्मानाबाद)  : उस्मानाबाद-सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील खडकी, धोत्री या गावांतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. 
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केलेल्या जिल्हाबंदीमुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही गावांपासून सोलापूर हे अवघ्या बारा किलोमीटरवर असल्याने दैनंदिन कामकाजासाठी सोलापूरला ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र जिल्हाबंदीमुळे सोलापूरला जाता येत नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात दोन्ही जिल्ह्यांतील महसूल अधिकाऱ्यांमार्फत हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

सोलापूर, तुळजापूर व उस्मानाबाद येथील महसूल प्रशासनाच्या सुसंवादामुळे आपत्कालीन परिस्थितीत दळणवळण करण्यासाठी संमती मिळाली तर ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार आहे. तुळजापूर तालुक्यातील खडकी व धोत्री ही दोन गावे सोलापूरपासून १२ किलोमीटर, तुळजापूर ३५, तर उस्मानाबाद ६५ किलोमीटर अंतरावर आहे. खडकी, धोत्री येथील ग्रामस्थांना वडजीमार्गे (ता. दक्षिण सोलापूर) सोलापूर गाठावे लागते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे खडकी गावाजवळच वडजीच्या हद्दीतच रस्त्यावर मातीचे ढिगारे टाकल्यामुळे खडकी, धोत्रीहून सोलापूरला जाणे कठीण झाले आहे.

हेही वाचलेच पाहिजे....विनाकारण फिरु नका, वाहने जप्त करू : डॉ. विपिन

सोलापूरच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना काही मंडळींनी दिलेल्या चुकीच्या माहितीने अन्य रस्ते आहेत, असे सांगितल्याने हद्दीतील सर्वच रस्ते बंद झाले. विशेषतः आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यानंतर खडकी, धोत्री येथून उळे (जि. सोलापूर) या रस्त्यावरून जाणे भाग पडणार होते. मात्र उळेमार्गे सोलापूरला जाणे गैरसोयीचे आहे. यासंदर्भात खडकी येथील ग्रामस्थ सुनील नागणे, शरफोद्दीन मुजावर, शिवाजी जाधव, परमेश्वर शिंदे, विद्याधर सोनवणे, अण्णासाहेब साबळे, नागनाथ घाडगे, नेताजी जाधव, राजू तळवडे, सचिन कोरे, अंदाप्पा जवान, आनंद कोरे, मल्लिनाथ सोनवणे, विशाल सावंत, बलभीम जाधव यांनी प्रशासनाकडे संपर्क साधून या दळणवळणाच्या प्रश्नांबाबतची माहिती तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.

प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती देऊन आरोग्यासाठी दळणवळणाचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगितले. संचारबंदी असल्याने कार्यालयात जाणेही कठीण झाले आहे. त्यानंतर वडजी येथील तलाठी, महसूल मंडल निरीक्षक, पोलिस पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन दळणवळण सुरू करण्याचे सांगितल्याने आता सोलापूरकडे जाण्याचा प्रश्न मिटेल, असे सांगण्यात येत आहे. 

खडकीपासून सोलापूर केवळ १२ किलोमीटर अंतरावर आहे. तर उस्मानाबाद ६५ किलोमीटरवर असल्याने सव्वा तास लागतो. उपचारासाठी ग्रामस्थांना सोलापूर शहर सोयीचे पडते. मात्र रस्ता बंद झाल्याने सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांच्याकडे दळणवळण प्रश्नाबाबत संपर्क करा, असे सांगितले. त्यानुसार तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सोलापूरच्या प्रशासनासोबत संपर्क साधल्याने दळणवळणाचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे. 
- सुनील नागणे, ग्रामस्थ, खडकी. 
मी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांच्याशी बोललो आहे. सोमवारी (ता. ३०) सायंकाळपर्यंत अडविलेला मार्ग मोकळा करतील. अत्यावश्यक सेवेसाठी त्यांना जाण्यास परवानगी देतील. 
- सौदागर तांदळे, तहसीलदार, तुळजापूर 
खडकी, धोत्री येथील ग्रामस्थांसाठी रस्ता मोकळा करून देण्यासाठी आम्ही कामास सुरवात केली आहे. 
- अमोल कुंभार, तहसीलदार, दक्षिण सोलापूर 
.......................