औरंगाबाद-जालन्यात आचारसंहिता लागू, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

मधुकर कांबळे
शुक्रवार, 19 जुलै 2019

विधानपरिषदेसाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शुक्रवार (ता.19) पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पुढील ऑगस्ट महिन्यात 19 तारखेला यासाठी मतदान होणार आहे. 

औरंगाबाद - विधानपरिषदेसाठी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. शुक्रवारपासून  (ता.19) आचारसंहिता लागू झाली आहे. पुढील ऑगस्ट महिन्यात 19 तारखेला यासाठी मतदान होणार आहे. 

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या ऑगस्ट 2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सुभाष झांबड विजयी झाले होते. शिवसेनेचे किशनचंद तनवाणी यांचा त्यांनी पराभव केला होता. विधानपरिषद सदस्य श्री. झांबड यांचा कार्यकाळ येत्या 29 ऑगस्टला संपत असल्यामुळे निवडणूक आयागाने नवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जुलैला निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाणार असून त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्र स्वीकारायला सुरवात होणार आहे.

1 ऑगस्ट ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असणार आहे. 2 ऑगस्टला अर्जांची छाननी केली जाईल; तर 5 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 19 ऑगस्टला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया राबविली जाईल. 22 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. 26 ऑगस्टपर्यंत ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात म्हटले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News about WidhanParishadh election