esakal | निलंग्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयावर गंडांतर
sakal

बोलून बातमी शोधा

nilanga

निलंग्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयावर गंडांतर

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर): एकेकाळी सहा तालुक्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय असलेल्या निलंगा येथील विभागीय कार्यालयाला जोडलेला एक-एक तालुके कमी होत चालला आहे. त्यामुळे भविष्यात विभागाचे कार्यालयच राहते की नाही? अशी शक्यता निर्माण झाली आहे.
औसा तालुकाही आता लातूर कार्यालयाला जोडण्यात आल्याने विभागीय कार्यालयावरच गंडांतर येणार असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दीर्घ काळ सार्वजनिक बांधकाम मंत्री व पाटबंधारे मंत्री असल्यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून निलंगा येथे वेगवेगळ्या विभागाचे विभागीय व उपविभागीय कार्यालये आणली होती.

त्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेल्या अनेक वर्षांपासून विभागीय कार्यालय निलंगा येथे असून, या कार्यालयाला निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ, औसा, उदगीर, जळकोट या सहा तालुक्यांचा समावेश होता. विविध विकास कामांसाठी मोठा निधी पूर्वी मिळत असल्याने येथील विभागीय कार्यालय सतत गजबजलेले असायचे. शिवाय कामाचा भारही अधिक प्रमाणात होता.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा वरिष्ठ स्तरावरील प्रशासन व मंत्रालयात मोठा दबदबा असल्याने कार्यालयाची विभागणी करण्याची कोणी हिम्मत करीत नसे. निलंगा येथे विभागीय कार्यालय असल्यामुळे येथे पाच उपविभाग होते. त्यामध्ये निलंगा, उदगीर, शिरूर अनंतपाळ, औसा व देवणी यांचा समावेश होता. लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदार संघ असून, दोन विधानसभा मतदार संघात एक विभागीय कार्यालय असा शासनाने नवीन फॉर्म्युला तयार केल्याने उदगीर उपविभाग तोडून तेथे स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: लातुरात बांधावरील ५० चंदनाच्या झाडांची चोरी!

निलंगा विभागीय कार्यालयातून देवणी व शिरूर अनंतपाळ हे उपविभाग त्या- त्या तालुक्याच्या ठिकाणी गेले आहेत. आता औसा तालुका लातूर येथील विभागीय कार्यालयाला जोडण्यात आला आल्याने निलंगा येथील कामाचा भार कमी झाला आहे. आता कार्यक्षेत्र कमी झाल्याने विभागीय कार्यालय निलंगा येथे राहते की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे विभागीय कार्यालय असले तरी शासनाकडून विविध योजनेसाठी फारसा निधी येत नाही. शिवाय ऑनलाइन निविदा प्रक्रिया झाल्याने येथील ठेकेदार व कार्यकर्त्यांची वर्दळ रोडावली आहे.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्तीकडे वाटचाल

औसा तालुका लातूर विभागाला जोडण्यात आला असून, येथे अजूनही निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळ असे तीन तालुके आहेत. सध्या तरी हे कार्यालय येथेच राहणार आहे. कामाचा व्याप व कर्मचारी व भौगोलिक दृष्ट्या पाहता येथे विभागीय कार्यालय कायम राहणे महत्त्वाचे आहे.
एम.एम. पाटील, कार्यकारी अभियंता

loading image