हिंगोलीत नऊ कोरोनाबाधित रुग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २१० झाली असून १८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी अकरा रुग्ण कोरोनामुक्त झाले असून नऊ रुग्णांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 

हिंगोली: जिल्ह्यात बुधवारी (ता.दहा) नऊ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याच बरोबर अकरा रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीबास यांनी दिली.

बुधवारी लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमधील नऊ संशयितांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यातील सहा व्यक्ती कलगाव येथील आहेत. तसेच सिरसम बुद्रुक, ब्राम्हणवाडा व सुकळी वळन येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून हिंगोली जिल्ह्यात आलेले आहेत.

हेही वाचाहिंगोलीत ३५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत -

औरंगाबाद येथील रुग्ण कोरोनामुक्त

 त्याच बरोबर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या हट्टा, गिरगाव येथील प्रत्येकी दोन, कुरुडवाडी, हयातनगर, कौठा, वसमत शहर येथील प्रत्येकी एक अशा आठ रुग्णांसह औरंगाबाद येथे धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. 

एकूण रुग्णांची संख्या २१० वर

तसेच जिल्हा रुग्णालयात उपचारघेत असलेले पहेणी येथील दोन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २१० झाली असून १८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता २८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

१९७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित

आतापर्यंत जिल्ह्यातील आयसोलेशन वार्ड व कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण दोन हजार ६३७ संशयितांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी दोन हजार २०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन हजार २३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्यस्थितीत ३९७ संशयित रुग्ण भरती असून त्यापैकी १९७ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

मुंबईवरून परतलेल्या जवानांची तपासणी करणार

हिंगोली : कोरोना काळात मुंबई येथे कर्तव्यावर गेलेल्या ९० जवानांची एक तुकडी मंगळवारी (ता. नऊ) हिंगोली येथे दाखल झाली असून या सर्व जवानांची आरोग्य तपासणी करून स्वॅब नमुने प्रयोगशाळेकडे पाठविणार असल्याची माहिती राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर यांनी दिली.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्‍ह्यात पावसाची दमदार हजेरी -

बाळापूर नजीक कॅम्पमध्ये भरती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी मुंबई येथे गेल्या होत्या. दोन महिन्यांनंतर मंगळवारी ९० जवानांची एक तुकडी हिंगोलीत दाखल झाली आहे. त्या सर्व जवानांना आखाडा बाळापूरनजीक असलेल्या कॅम्पमध्ये भरती करण्यात आले आहे. 

कोरोनाशी साम्य लक्षणे नाहीत

आता या सर्व जवानांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन नांदेड येथील प्रयोग शाळेकडे पाठविले जाणार आहेत. सध्या तरी कोणत्याही जवानात कोरोनाशी साम्य असलेली लक्षणे दिसून येत नाहीत. किरकोळ सर्दी, खोकला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त होताच सर्व स्पस्ट होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी सर्व जवान ठणठणीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Coronary Artery Patients Were Found In Hingoli Hingoli News