esakal | उदगीरसह तालुक्यातील तेराशे नऊ शिक्षकांपैकी केवळ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

20navi_20mumbai_6_1

नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्‍यांच्या आदेशानुसार उदगीरसह तालुक्यातील शासकीय, निमशासकीय अशा एकूण तेराशे नऊ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली.

उदगीरसह तालुक्यातील तेराशे नऊ शिक्षकांपैकी केवळ सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने जिल्हाधिकाऱ्‍यांच्या आदेशानुसार उदगीरसह तालुक्यातील शासकीय, निमशासकीय अशा एकूण तेराशे नऊ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात केवळ सात शिक्षकांचा व एका सेवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे यांनी दिली आहे. कोरोनाच्या संसर्गाची सुरवात लातूर जिल्ह्यात उदगीरपासून झाली होती. अनेक दिवस परिसरात कोरोनाने थैमान घातले होते. या संसर्गाने आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू झाला आहे. शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढले होते. मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजनाने ही संसर्गाची साथ आटोक्यात आली आहे.


उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या नियोजनानुसार तहसीलदार रामेश्वर गोरे,  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास, कोरोना रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.शशिकांत देशपांडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कापसे यांच्या संयुक्त पथकाने शहर व तालुक्यातील पन्नास वर्षांवरील व्यक्तींचे सर्वेक्षण करून लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या केले आहेत. त्यात लागण झालेल्या रुग्णांवर कोरोना रुग्णालयात उपचार करून घरी पाठवले आहेत

त्यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी झालेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये शिक्षकांच्या तपासण्या करण्यात येत आहेत. यात अॅटिजेन व आरटीपीसीर या दोन्ही चाचण्यांचा समावेश असून शनिवारी (ता.२१) या एका दिवशीच १०४२ शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या एकवीस पथकाने शिक्षण विभागाच्या सहकार्याने या तपासण्या केल्या असता यात सात शिक्षक व एक सेवकास लागण झाल्याचा अहवाल आला आहे.

संपादन - गणेश पिटेकर