Loksabha 2019 : एकही प्रश्‍न मार्गी न लागल्याने मराठा समाज अस्वस्थ : नितेश राणे

राजेभाऊ मोगल 
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

मराठा समाजाने मागील अडीच वर्षात विविध प्रश्‍नांवर रान पेटविले. ऐतिहासिक मोर्च अशी नोंद घेण्यात आलेली असताना सरकारने मात्र त्याकडे दूर्लक्ष केले. यामुळे समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

औरंगाबाद :  राज्यासह देशभरात 58 हून अधिक मोर्चे काढूनही मराठा समाजाच्या पदरात काहीही पडले नाही. असे असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठा आंदोलकांना नोटीसा देता आणि तिकडे मनोहर भिडेंना साधी पोलिस ठाण्याची पायरीदेखील चढावी लागू नये, याची काळजी घेता, हे आता सर्वांना कळून चुकले आहे. आंदोलने करूनही प्रश्‍न मार्गी न लागल्याने सध्या मराठा अस्वस्थ आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत समाज राज्यकर्त्यांना जागा दाखवेल, अशा शब्दांत आमदार नितेश राणे यांनी येथे टिका केली. 

औरंगाबाद लोकसभेचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार सुभाष पाटील यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी (ता. 4) आमदार राणे यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. त्यानंतर सकाळशी बोलताना ते म्हणाले, जनतेचे प्रश्‍न सुटले नाही तर त्याची किंमत मोजावी लागते. मतातून परिवर्तन करण्याचे मोठे हत्यार त्यांच्याकडे आहे. सत्ताधाऱ्यांकडून युवकांच्या कुठल्याही प्रश्‍नांची सोडवणूक झालेली नाही. 

मराठा समाजाने मागील अडीच वर्षात विविध प्रश्‍नांवर रान पेटविले. ऐतिहासिक मोर्च अशी नोंद घेण्यात आलेली असताना सरकारने मात्र त्याकडे दूर्लक्ष केले. यामुळे समाजामध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

भिडे मोकाट अन्‌ मराठा आंदोलकांना नोटीसा कशासाठी?
ज्यांना विविध कलमाखाली तुरुगांत टाकायला हवे ते मनोहर भिडे मोकाट आहेत. मात्र, ज्या मराठा समाजाने पहिल्यांदाच आपल्या प्रश्‍नांवर लोकशाहीमार्गाने आंदोलने केली. त्यांना सरकार निवडणुकीच्या तोंडावर नोटीसा पाठविते. यातून सरकार मराठाविरोधी असल्याचेच स्पष्ट होते. हे सर्व समाजाला कळून चुकले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीत समाज दूर्लक्ष करणाऱ्यांना माफ करणार नाही, असा इशाराही आमदार राणे यांनी दिला.

Web Title: Nitesh Rane Criticized State and central Government at Aurangabad