नितीन गडकरी देशातील सर्वात चांगले मंत्री - इम्तियाज जलील 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

आम्ही विरोधक असलो तरी देशात सर्वात चांगल काम करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरींचा सन्मान करतो ,अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सभागृहात गडकरींच्या कामाचे कौतुक केले.

औरंगाबाद :  मोटार वाहन कायदा 2019 चे दुरुस्ती विधेयक संसदेत मांडणारे या खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या नियतीवर कुणीही शंका घेऊ शकत नाही. आम्ही विरोधक असलो तरी देशात सर्वात चांगल काम करणारे मंत्री म्हणून नितीन गडकरींचा सन्मान करतो ,अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सभागृहात गडकरींच्या कामाचे कौतुक केले.

मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करत असतांना मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आणि शेकडो निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्यावर वचक कसा बसवणार असा सवाल देखील इम्तियाज यांनी यावेळी केला. 

खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या पहिल्याच संसद अधिवेशनात मतदारसंघातील विकासकामांसोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ आणि आता मद्यपान करून वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांच्या मुद्याला हात घालत प्रश्‍न उपस्थितीत केले. रस्ते अपघातात मरण पावणाऱ्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाकडून मोटार वाहन कायदा दुरूस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले. 

यावरील चर्चेत सहभाग नोंदवतांना इम्तियाज जलील यांनी सुरूवातीलाच नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. इम्तियाज जलील म्हणाले, केंद्रीय मंत्री म्हणून देशात सर्वात चांगले काम जर कुणी करत असेल तर ते नितीन गडकरी आहेत. मी विरोधी पक्षाचा खासदार असलो तरी त्यांच्या हेतूवर शंका घेतली जाऊ शकत नाही. पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वे हे गडकरींच्या चांगल्या कामाचे एक उदाहरण आहे. त्याचे श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त गडकरीनांच. 

रस्ते अपघात कसे रोखणार?  
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कठारे कारवाई करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती करणे निश्‍चितच चांगली बाब आहे. पण एकीकडे सरकार महसुल मिळतो म्हणून दारू विक्रीचे परवाने वाटत सुटली आहे, आणि दुसरीकडे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असे सांगते. मग या दोन्ही गोष्टी एकाचवेळी कशा करणार असा प्रश्‍न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. 

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पाचशे मीटर अंतरातील दारु विक्रीची दुकाने, बिअर बार यांच्यावर बंदी घालण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला होता. मात्र दारू विक्रेत्यांच्या लॉबीने तो हाणून पाडला. दारू पिऊन बेदरकारपणे लोक वाहने चालवतात, त्यात निष्पापांचे बळी जातात हे कधी थांबवणार. 

मुंबईत झालेल्या घटनेत एका स्कोडा गाडीने त्याच्या आई समोरच सात वर्षाच्या चिमुरड्याला चिरडले. सरकार त्या कुटुंबाला आर्थिक मदत करेल देखील, पण एका आईच्या दृष्टीने त्या मदतीपेक्षा तिच्या मुलाचीच किमंत अनमोल असते, सरकारी मदतीने त्या माऊलीचे नुकसान कधीच भरून निघू शकत नाही असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nitin Gadkari is the best minister in the country says Imtiyaz Jaleel