चार कोटींचा गंडा घालणारा व्यावसायिक नितीन शेळके अटकेत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : व्यवसायात गुंतवणुकीवर नऊ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे चार कोटी 29 लाख 66 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी शेळके समूहाचा मालक नितीन शेळके (36, रा. वेदांतनगर) याला पोलिसांनी सोमवारी (ता.30) रात्री अटक केली. 
या प्रकरणात हर्षल झरेकर (32, रा. न्यू विशालनगर, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची ऑगस्ट 2018 ला जालना रोडवरील कुबेर ऍव्हेन्यूमधील नित्यसेवा सर्व्हिसेस दुकानात नितीन शेळके व सत्यकुमार शेळके यांच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी नितीन याने त्याच्या शेळके उद्योग समूहाची माहिती दिली. तसेच नित्यसेवा, उडपी गोविंदम हॉटेल, एस.आर. कन्स्ट्रक्‍शन अशा व्यवसायांची नावेही सांगितली. यात गुंतवणूक केल्यास नऊ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून झरेकर यांच्यासह त्यांचे सासरे व इतरांनी वेळोवेळी सुमारे तीन कोटी 29 लाख 65 हजार 999 रुपयांची गुंतवणूक केली. 
 
दामदुप्पट नव्हे, फसवणूक 

संशयिताने व्याज व मूळ रक्कम परतावा न दिल्याने फसवणूक झाल्याचे झरेकरांच्या लक्षात आले. त्यांनी पैशांची मागणी केली; परंतु रक्कम मिळालीच नाही. यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता संशयितांनी चार कोटी 30 लाख 98 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी 

संशयित शेळकेला न्यायालयात हजर करण्यात आले असता, शुक्रवारपर्यंत (ता.चार) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी मंगळवारी (ता.एक) दिले. या प्रकरणात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असून, त्यांची एकूण चार कोटी 30 लाख 98 हजार 999 रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. तसेच झरेकर व त्यांच्या वडिलांकडून बॅंकेद्वारे 41 लाख 52 हजार रुपये दिले होते, त्यापैकी 11 लाख 86 हजार 58 रुपये त्यांना परत केल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले. 

गंडा घालण्याचा अनोखा फंडा 

संशयिताने गुंतवणूकदारांना विश्‍वास बसावा म्हणून प्रोझोन मॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले. वर्तमानपत्रात मुलाखत प्रसिद्ध केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. संशयितांनी अनेकांची फसवणूक केल्याने गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रारीसाठी धाव घेतली. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयिताचा भाऊ सत्यकुमार पसार असून, त्याला अटक करायची असल्याने संयशिताला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक लोकअभियोक्ता अजित अंकुश यांनी न्यायालयाकडे केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com