बॅंकेतून पैसे मिळेनात अन्‌ एटीएमचे शटर डाऊनच! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

अहमदपूर - शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांतून सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे; मात्र या गर्दीमधील एकालाही समाधानकारक रक्कम बॅंकेतून मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय शहरातील बॅंकांच्या एटीएमचे "शटर डाऊन' असल्याने या संतापात अधिकच भर पडते आहे. 

अहमदपूर - शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत व सहकारी बॅंकांतून सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत आहे; मात्र या गर्दीमधील एकालाही समाधानकारक रक्कम बॅंकेतून मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय शहरातील बॅंकांच्या एटीएमचे "शटर डाऊन' असल्याने या संतापात अधिकच भर पडते आहे. 

नोटबंदीचा निर्णय होऊन पाच महिने उलटून गेले, तरी अजून परिस्थिती सामान्य झाली नसल्याने सर्वसामान्य मात्र अडचणीत आले आहेत. बॅंकेच्या ग्राहकांना रक्कम काढण्याची मर्यादा उठवल्यानंतरही अजून आवश्‍यक तेवढी रक्कम ग्राहकांना मिळत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकेतूनही कधी पाच तर कधी दहा हजार रुपये काढण्याची परवानगी दिली जाते. वीस किंवा तीस हजार रुपये प्रति ग्राहक मिळण्याची वेळ पाच महिन्यांपासून आजवर फार कमी वेळा आली आहे. रक्कम बॅंकेत भरण्याच्या तुलनेत काढण्याचे प्रमाण अधिक असल्याने तसेच संबंधित बॅंकेला पुरेसा चलन पुरवठा होत नसल्यामुळे ही चलन टंचाई निर्माण होत असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले. 

शहरातील सहकारी बॅंकांची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. या बॅंकांतून तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी, निवृत्ती वेतनधारकांची, नोकरदारांची पगार खाती आहेत; मात्र या बॅंकांमधून पुरेसे चलनच नसल्याने ते ग्राहकांना पैसे देण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे कधी दोन तर कधी चार हजार रुपये ग्राहकांना मिळतात. त्यामुळे काल बॅंकेच्या रांगेत असणारी व्यक्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत उभी राहते आहे. 

पर्याय काढूनही गर्दीच! 
यावर पर्याय म्हणून अनेक ग्राहकांनी इतर बॅंकांत आरटीजीएस किंवा नेफ्ट करण्याचा उपाय निवडला आहे. त्यामुळे आता तेथेही मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. बॅंकेतील आरटीजीएस, नेफ्टचे फॉर्म संपल्याचा गैरफायदा झेरॉक्‍स सेंटरचे चालक घेत असून, आरटीजीएस, नेफ्टचा एक फॉर्म पाच रुपयांना विकत आहेत. बॅंकांतून आवश्‍यक तेवढे पैसे मिळत नसल्यामुळे ग्राहक व बॅंक कर्मचारी यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्‌भवताना दिसत आहेत. 

Web Title: No cash in ATM