esakal | स्मशानभूमी नसल्याने जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार; लातूर जिल्ह्यातील बावलगाव, उजळंबमधील स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal-Dotted-Logo-square

लातूर जिल्ह्यातील बावलगाव, उजळंब या गावात स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार करण्याची वेळी आली आहे.

स्मशानभूमी नसल्याने जागा मिळेल तिथे अंत्यसंस्कार; लातूर जिल्ह्यातील बावलगाव, उजळंबमधील स्थिती

sakal_logo
By
उद्धव दुवे

रोहिणा (जि.लातूर) : बावलगाव (ता. चाकूर) येथे रविवारी (ता.११) स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी शेतात करावा लागला. मात्र परतीच्या पावसाने गाठल्यावर धार्मिक विधीनुसार चिता पेटविण्यासाठी तुपाचा वापर केला जातो. पण येथे मात्र चिता पेटविण्यासाठी वाहनांचे टायर आणि डिझेलचा वापर करावा लागला. येथील राधाबाई व्यंकटराव बजगिरे यांचे शनिवारी (ता.दहा) रात्री साडेदहा वाजता वयाच्या ६० व्या वर्षी आजारपणामुळे लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासा

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आणि नातू असा परिवार आहे. त्या युवक काँग्रेसचे कार्यकर्ते भरत व्यंकटराव बजगारे (रेड्डी) यांच्या मातोश्री होत्या. त्यांचा अत्यंविधी रविवारी मूळगावी बावलगाव येथे गावापासून दोन किमी दूर शेतात करण्यात आला. मात्र अंत्यविधी सुरु असतानाच परतीच्या पावसाने गाठले. चिता पेटविण्यापूर्वीच पाऊस सुरु झाला. धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करताना चिता पेटविण्यासाठी तुपाचा वापर केला जातो, परंतू सरण भिजल्याने वाहनांचे टायर व डिझेल इंधन वापरुन सरण पेटविण्यात आले.

अंत्यविधीसाठी जमलेले सगेसोयरे आसरा नसल्याने पावसात भिजले. एक हजार लोकसंख्या व १५० कुटुंब संख्या असलेल्या बावलगावात लिंगायत, मराठा, ब्राह्मण, धनगर, कोळी, दलित आणि येलम अशा आठ समाजाचे लोक येथे राहतात. मात्र एकाही समाजासाठी येथे स्मशानभूमीची जागा किंवा स्मशानभूमी नाही. ज्यांना शेती आहे ते शेतात अंत्यविधी करतात. पण ज्यांना शेतीच नाही ते मात्र गावालगतच्या ओढ्याच्या काठावर अंत्यविधी उरकतात.

अंत्यसंस्कार करताना कळाले मृतदेह नातेवाइकाचा नाही, पुन्हा गाठवे लागले रुग्णालय

या परिसरातील आंबेवाडी, कुंभेवाडी, उजळंब, नागेशवाडी, गोविंदवाडी, रोहिणा येथील दलित समाज, कबनसांगवी येथील दलित आणि लिंगायत समाज यापैकी काहींना जागा आहे. पण शेड नाही तर काहींना जागाच नसल्याने मृतदेहाची परवड होत आहे. राजकीय अनास्था व प्रशासनाची सुस्तीमुळे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपेक्षित राहिला असून लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधून प्रशासनाने विषय निकाली काढण्याची मागणी केली जात आहे.

पती व पत्नीवर अंत्यसंस्कार नालीत
उजळंब (ता. चाकूर) येथील सेवानिवृत्त शिक्षक शेषराव पांचाळ यांचा २३ आॅगस्ट व त्यांच्या पत्नीचा ५ सप्टेंबर रोजी निधन झाले. मात्र उजळंब येथे सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्राशेजारी रस्त्यालगत असलेल्या नालीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. विधीनुसार दुध घातले व राख सावडली जाते मात्र पाऊस पडला आणि पाण्याने राख वाहून गेली. प्रत्येक गावाला किमान एक तरी सार्वजनिक स्मशानभूमी हवी. यासाठी प्रमाणिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. अशी मागणी केली जात आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर