मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; लातूर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यासाठी दिलासा

हरी तुगावकर
Monday, 12 October 2020

लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा (धनेगाव, ता. केज) धरणाचा पाणीसाठा १५४.२० दशलक्ष घनमीटर झाला आहे.

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा (धनेगाव, ता. केज) धरणाचा पाणीसाठा १५४.२० दशलक्ष घनमीटर झाला आहे. रविवारी (ता. ११) अकरा तासात सहा दशलक्षघनमीटर पाणीसाठा वाढला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने या तीनही जिल्ह्यांच्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

मांजरा धरणातून लातूरसह उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील काही शहरे व ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी या धरणात पावसाचे पाणी आले नव्हते. त्यामुळे पूर्ण वर्षभर धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा केला गेला. यावर्षी मात्र सुरवातीपासून या धरणात हळूहळू का होईना पावसाचे पाणी येत आहे. चार महिन्यांच्या कालावधित धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जूनपासून ते आतापर्यंत धरणात १४९.०९ दशलक्षघनमीटर पाण्याची आवक झाली आहे.

निलेश राणे यांच्यासह दोघांविरोधात बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल

या धरणात रविवारी (ता. ११) सकाळी सहा वाजता १४८ दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला होता. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता धरणात १५४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा झाला आहे. म्हणजे रविवारी अकरा तासात धरणात सहा दशलक्षघनमीटर पाणी आले आहे. त्यामुळे पाणीसाठा वाढण्य़ास मदत झाली आहे. सध्या धरणात १५४ दशलक्षघनमीटर पाणीसाठा असला तरी त्या पैकी १०७.०७ दशलक्षघनमीटर हा उपयुक्त पाणीसाठा आहे.

मुक्त विद्यापीठाच्या बीए अंतिम वर्षाच्या परीक्षा मंगळवारपासून होणार सुरु

धरण भरले ६८ टक्के
मांजरा धरणात काही दिवसांपासून पाणीसाठा वाढत आहे. अकरा दिवसांत धरणातील पाणीसाठ्यात १७ दशलक्षघनमीटरने वाढ झाली आहे. सध्या हे धरण ६८.८१ टक्के भरले आहे. यातील उपयुक्त पाणीसाठा ६०.५० टक्के इतका आहे. सध्या परतीचा पाऊस सुरु आहे. मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही अंशी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manjara Dam's Water Stock Increases Latur News