कळमनुरीत बाहेरगावातील नागरिकांना ‘नो एंट्री’

संजय कापसे
Sunday, 5 April 2020

शहरातील प्रमुख ठिकाणावरून पोलिसांनी नियमित बंदोबस्त ठेवला आहे. बसस्थानक, चौक बाजार, जुने बसस्थानक, मोठा मारुती मंदिर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. अनेक भागातील रस्ते बंद करण्यात येऊन बाहेरील नागरिकांना नो एंट्री करण्यात आली आहे. 

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराची शहरतील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक दक्ष झाले असून अनेक भागातील रस्ते बंद करण्यात येऊन बाहेरील नागरिकांना नो एंट्री करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर रविवारी (ता. पाच) शुकशुकाट जाणवत होता.  

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद पाळण्यात येत असताना रस्त्यावर शुकशुकाट निर्माण झाला आहे. मात्र, गल्लीबोळांमधून युवक व नागरिकांनी अजूनही विनाकारण फिरणे कायम ठेवले आहे. शहरातील प्रमुख ठिकाणावरून पोलिसांनी नियमित बंदोबस्त ठेवला आहे.

हेही वाचाहिंगोलीकरांनी अनुभवली निरव शांतता

१८ युवका विरुद्ध गुन्हे दाखल

बसस्थानक, चौक बाजार, जुने बसस्थानक, मोठा मारुती मंदिर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहरात विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱ्या १८ युवका विरुद्ध पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत करून मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

पोलिसांची फिरती गस्त

 शहरात जमावबंदी होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी फिरती गस्त ठेवली आहे. शहरातील अनेक विभागातील गल्लीबोळांतील रस्ते, त्या त्या भागातील युवकांनी बॅरिकेट पद्धतीने लाकडे आडवे लावून बंद करून घेतले आहेत. या विभागात इतर गल्लीतील युवक व नागरिकांना नो एंट्री करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर नागरिकांतून सतर्कता

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांकडून सतर्कता दाखवली जात असून बाहेरगावांहून आलेल्या प्रत्येक व्यक्तींबाबत आता चौकशी केली जात आहे. काही संशयास्पद आढळल्यास या प्रकाराची माहिती पोलिस व आरोग्य विभागाला दिली जात आहे. कोरोना आजाराची व्याप्ती वाढत असताना शहर व परिसरातील नागरिकांमधूनही या आजाराबाबत आता जनजागृती झाली आहे.

लाकडे आडवी लावून प्रवेशद्वार बंद

गर्दीचे ठिकाण टाळून सुरक्षित अंतरावर राहून खरेदी-विक्री करण्याचे व्यवहार नागरिक व व्यावसायिक दुकानदारांनी अंगिकारले आहेत. अनेक भागात बाहेरील गल्लीतील नागरिकांना नो एंट्री करण्यात आली आहे. त्याकरिता गल्लीचे प्रवेशद्वार लाकडे आडवी लावून बंद करण्यात आली आहेत. यानंतरही बाहेरगावांहून आलेल्या प्रत्येक व्यक्तीची विचारपूस व माहिती ठेवली जात आहे.

येथे क्लिक कराकर्तव्य बजावत पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

शेवाळ्यात जाणवतोय शुकशुकाट

शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे लॉकडाउन पाळले जात असून गावातील किराणा दुकाने व औषधीची दुकाने दिलेल्या वेळेत सुरू आहेत. मात्र, तीन दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचे आदेश दिल्यानंतर मात्र कोणी घराच्या बाहेर निघेनासे झाले आहेत. दुकानदारांनीदेखील मोबाइलच्या कॉलवर घरपोच सामान देणे सुरू केले आहे.

अनेकांची  झाली गैरसोय

दोन दिवसांपासून रुग्णालये व औषधी दुकाने वगळता इतर दुकाने बंद आहेत. किराणा दुकानही दोन दिवसांपासून उघडलेच नाहीत. यामुळे अनेकांची गैरसोय झाली. काही दुकानदारांनी फोनवरदेखील घरपोच सामान देणे सुरू केले होते. मात्र, ज्यांनी जास्‍त सामान खरेदी केले त्‍यांनाच घरपोच सेवा दिली. कमी सामानाची खरेदी करणाऱ्यांना अडचणी आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'No Entry' to outsiders in Kalmanuri Hingoli news