औरंगाबादेतील ऐतिहासिक दरवाज्यांजवळच्या रस्त्यांना निधीचे ग्रहण

सुषेन जाधव
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

  • औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल 
  • निधी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्याची याचिकेत विनंती 
  • ऐतिहासिक दरवाज्याची हेळसांड सुरुच 
  • पाच वर्षापासून सुरु आहे न्यायालयीन लढा 

औरंगाबाद : शहरातील तीन ऐतिहासीक दरवाजांजवळ रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी देण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेत औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना प्रतिवादी करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे आणि न्यायमूर्ती अनिल एस. किलोर यांनी दिली आहे. त्यांनी तीन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश खंडपीठाने दिला आहे. 

हेही वाचा - लवकर खराब होते तरीही हॉटेलमध्ये पांढऱ्याच बेडशीट का वापरतात? वाचा..

माजी नगरसेवक इक्‍बालसिंग गिल यांनी 2014 मध्ये खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी म्हटल्यानुसार खाम नदीवरील बारापुल्ला दरवाजा, मकाई दरवाजा आणि महेमूद दरवाजा हे औरंगाबाद शहराच्या स्थापनेच्या काळातील ऐतिहासिक दरवाजे आहेत. मात्र, सध्या ते मोडकळीस आले आहेत. या तिन्ही दरवाजांमधून शहरातून बाहेर आणि बाहेरून शहरात लोकांची आणि वाहनांची सतत ये-जा चालू असते. या दरवाजांलगतचे पूलदेखील अत्यंत कमकुवत झाले आहेत. पुलांचे पिलर आणि दरवाजांवर झाडे उगवली आहेत. मोडकळीस आलेल्या या दरवाजांमध्ये मोठा अपघात होऊन जीवित व वित्त हानी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या तिन्ही दरवाजांलगत पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी शासनाने निधी द्यावा, अशी विनंती याचिकेद्वारे करण्यात आली आहे. 

हेही वाचा - बाइकमध्ये पेट्रोलऐवजी डिझेल टाकले तर...? जाणून घ्या!

पुलांच्या कामासंदर्भात महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना 16 मे 2019 रोजी पत्र पाठविल्याचे तसेच या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 30 कोटी रुपयांची मागणी केली असून, तो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, असे महापालिकेच्या वकील अंजली दुबे-वाजपेयी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी 10 डिसेंबर 2019 रोजी होणार आहे. 

ऐतिहासिक दरवाज्याचीही हेळसांड 

शहरात बारापुल्ला दरवाजा, मकाई दरवाजा आणि महेमूद दरवाजा, दिल्ली दरवाजा, पैठण दरवाजा, कटकट दरवाजा असे तब्बल 52 ऐतिसाहिक दरवाजे आहेत. असं म्हणतात की, शहरातील जून्या काळात हे 52 दरवाजे बंद केल्यानंतर औरंगाबाद शहरात प्रवेश मिळत नसे, तसेच शहरातूनही कोणी बाहेर जाऊ शकत नव्हते. घर बंद केल्यासारखे पूर्णच शहर बंद होत असे. मात्र दिवसेंदिवस दरवाज्याची पडझड सुरु झाली. त्याकडे मात्र पाहिजे तसेच लक्ष देणे शक्‍य होईनासे झाले. शहरातील अशा बहूतांश ऐतिहासिक दरवाज्यांची हेळसांड झाल्याचे चित्र आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Funds For Roads, Near Historical Gates in Aurangabad