बाजारसावंगी येथील निवृत्तिवेतनधारकांना मिळेना वेतन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

बाजारसावंगी (ता. खुलताबाद) परिसरातील जिल्हा परिषदेचे निवृत्तिवेतनधारक येथील राष्ट्रीयीकृत एकमेव महाराष्ट्र बॅंक शाखेतून निवृत्तिवेतन घेत असतात. त्यांनी हयात असल्याबद्दलचे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2019 अखेर सादर करणे बंधनकारक असताना खुलताबाद पंचायत समितीतर्फे निवृत्तिधारकांची यादी हयात प्रमाणपत्र नमुना सदर बॅंक शाखेत न पाठवल्याने निवृत्तिवेतनधारक दररोज या बॅंकेत येऊन परत जात आहेत. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांमध्ये नाराजी आहे.

बाजारसावंगी,(बातमीदार) ः बाजारसावंगी (ता. खुलताबाद) परिसरातील जिल्हा परिषदेचे निवृत्तिवेतनधारक येथील राष्ट्रीयीकृत एकमेव महाराष्ट्र बॅंक शाखेतून निवृत्तिवेतन घेत असतात. त्यांनी हयात असल्याबद्दलचे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2019 अखेर सादर करणे बंधनकारक असताना खुलताबाद पंचायत समितीतर्फे निवृत्तिधारकांची यादी हयात प्रमाणपत्र नमुना सदर बॅंक शाखेत न पाठवल्याने निवृत्तिवेतनधारक दररोज या बॅंकेत येऊन परत जात आहेत. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांमध्ये नाराजी आहे.

येथील महाराष्ट्र बॅंक शाखेत जिल्हा परिषद कार्यालयातर्फे अनेक वर्षांपासून निवृत्त झालेले माध्यमिक व प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक, चतुर्थश्रेणी कर्मचारी व इतर विभागांचे निवृत्त झालेले कर्मचारी दरमहा निवृत्तिवेतन घेत असतात. अनेक निवृत्तिवेतनधारक यावर्षी हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी येतात व सादर करण्याची विनंती करतात. परंतु यादी व प्रमाणपत्र नमुना उपलब्ध न झाल्याने रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. पंचायत समितीकडून यादी आल्यावरच बॅंकेतर्फे स्वीकारण्यात येईल, असे सांगितले जाते.

खुलताबाद पंचायत समितीचा वित्त विभाग दरवर्षीच या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मागील वर्षी प्रमाणपत्राचा नमुना पाठवला नाही.
ज्या बॅंकेतून निवृत्तिवेतनधारक वेतन स्वीकारतात, त्याच बॅंक व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीसह कागदपत्रे सादर करण्यात यावीत, असा आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी नुकताच दिला असला तरीही पंचायत समितीने कार्यवाही केलेली नाही.
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Pension For Pensioners