धारा : पावसाच्या नव्हे, घामाच्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

जुलै निम्मा म्हटले म्हणजे खळाळत्या नद्या, सर्वत्र हिरवाई, सजलेले शेतशिवार, सजीव झालेले जलस्रोत अन्‌ गारवा. मराठवाडा मात्र या वातावरणापासून दुरावला आहे. सर्वदूर समाधानकारक पाऊसच न झाल्याने ही स्थिती. आतापर्यंत कधीतरी, कुठेतरी रिपरिपणारा पाऊसही गायब झाल्याने पुन्हा उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद -  जुलै निम्मा म्हटले म्हणजे खळाळत्या नद्या, सर्वत्र हिरवाई, सजलेले शेतशिवार, सजीव झालेले जलस्रोत अन्‌ गारवा. मराठवाडा मात्र या वातावरणापासून दुरावला आहे. सर्वदूर समाधानकारक पाऊसच न झाल्याने ही स्थिती. आतापर्यंत कधीतरी, कुठेतरी रिपरिपणारा पाऊसही गायब झाल्याने पुन्हा उन्हाळा सुरू झाल्याचे चित्र आहे. सर्व जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झाली असून, उकाडाही त्रस्त करतोय.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याच्या नजरा आभाळाकडे होत्या. जुलै निम्मा झाला तरी सर्वत्र मनसोक्त पाऊस कोसळलेला नाही. आतापर्यंत केवळ तुरळक, रिमझिम, मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. तोही कुठेतरी. त्यामुळे जलस्रोत कोरडेठाक आहेत. पाणीटंचाई कायम असून, नागरिकांची तहान भागविण्यासाठी शेकडो टॅंकर भिरभिरत आहेत. चाऱ्याचा प्रश्‍न कायम आहे. अल्प पावसावर काही शेतकऱ्यांनी धाडस करून केलेली पेरणी वाळत आहे. या साऱ्या स्थितीत मोठा तर सोडाच; पण काही भागांत का होईना, रिमझिमणारा पाऊसही गेल्या काही दिवसांपासून गायब झाला आहे. ढगाळ वातावरणही दिसेनासे झाले आहे. किरकोळ पाऊस, ढगाळ वातावरणामुळे तापमान खाली आले होते. आता ते वाढले आहे. उकाडाही त्रस्त करतोय. सर्वदूर जोरदार पाऊस बरसावा, त्याच्यात सातत्य असावे, अशी मराठवाडावासीयांची अपेक्षा आहे.

शहरनिहाय बुधवारी नोंदले गेलेले कमाल तामपाम अंश सेल्सिअसमध्ये असे - नांदेड ३६, परभणी ३६.८, हिंगोली ३५, लातूर, उस्मानाबाद ३५, बीड, जालना ३४, औरंगाबाद ३३.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No rain in marathwada