बैलपोळ्यासाठी बाजार सजला पण, शेतकरी फिरकेनात!

No response to weekly market Because of drought situation
No response to weekly market Because of drought situation

युसुफ वडगाव, जि. बीड : पोळा सणाच्या निमित्ताने बैलांना सजविण्याच्या विविध रंगबिरंगी वस्तूंनी बाजार फुलला आहे. पण, दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी या बाजाराकडे फिरकेनासा झाला आहे. कारण त्याच्यापुढे चिंता आहे ती, जनावरे जगविण्याची. पावसाचा ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवली असल्याने जनावरांच्या चारा, पाण्यासाठी शेतकरी वणवण करत आहेत. साहजिकच आठवडी बाजारावर आणि पर्यायाने बैलपोळा सणावर मंदीचे सावट पसरले आहे.

यंदाच्या वर्षी शुक्रवारी (ता. 30) बैलपोळा साजरा केला जाणार आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला पोळ्याच्या दिवशी विविध प्रकारे सजविले जाते. गळ्यात चंगाळे (घंटा) बांधल्या जातात. सुती धाग्यात विणलेल्या चंगाळ्यांवर लोकरी गोंडे गुंफलेले असतात. बाजारातील बहुतांश घंटा या पितळेच्या आहेत. त्यामुळे एका जोड चंगाळ्याची किंमत 400 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत आहे. तर, चामड्याच्या तयार केलेल्या चंगाळ्याची किंमत 500 रुपयांपासून एक हजारापर्यंत आहे.

दोरीत रंगीत धागे विणून बनवलेले गोंडे बाजारात आले आहेत. त्याची किंमत 40 रुपयांपासून 110 रुपयांपर्यंत आहे. बैलांच्या गळ्यातील कवड्याच्या माळा 110 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. शिंगांना लावण्यासाठी विविधरंगी रंग बाजारात आले आहेत. बैलांना सजविण्याची ही सर्व आभूषणे शेतकरी दरवर्षीच्या पोळ्याला नव्याने घेतो. पण, यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजाच्या हातात पैसा खेळत नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या सर्जा-राजाला पोळ्याच्या दिवशी जुन्याच आभूषणांनी त्याला सजवावे लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे बैलच उरले नाहीत...
दरवर्षीच्या जनावरांच्या चारा, पाण्याच्या प्रश्नाला कंटाळून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे चार ते पाच बैलजोड्या असायच्या. आज त्यांच्या गोठ्यात एकही बैल पाहायला मिळत नाही. काही ठराविकच शेतकऱ्यांकडे एखाददुसरी बैलजोडी दिसून येत आहे. त्यामुळे पोळ्याला त्यांच्या लाडक्या बैलांसाठी वस्तू खरेदी करण्याचे प्रमाण घटले आहे.
- विक्रम सावंत, विक्रेते, युसूफ वडगाव, बीड

लाडक्या बैलांसाठी काही तरी करावे लागणार...
पोळ्याच्या सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे दर वाढले आहेत. दर जरी वाढले असले तरी, लाडक्या सर्जा-राजासाठी कर्जाने का होईना, साहित्य खरेदी करावेच लागणार आहे. 
- वैभव थळकरी , शेतकरी , युसूफ वडगाव, बीड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com