एसटी प्रवाशांची दिवाळी होणार गोड

सुशांत सांगवे
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

विधानसभा निवडणुकीमुळे दिलासा; एसटीच्या तिकीट दरात हंगामी वाढ अद्याप नाही 

लातूर : दिवाळीच्या दिवसांत खासगी बसप्रमाणेच एसटी महामंडळाच्या बसच्या तिकीट दरात हंगामी वाढ केली जाते; पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा अद्यापही वाढ झाली नाही. त्यामुळे प्रवाशांची अर्थात मतदारराजाची दिवाळी गोड जाणार, हे स्पष्ट होत आहे. पण निवडणुका संपल्यानंतर भाडेवाढ होणार नाही ना, अशा शब्दांत प्रवाशांमधून चिंताही व्यक्त केली जात आहे. 
खासगी वाहतूकदारांच्या तीव्र स्पर्धेने हतबल झालेले एसटी महामंडळ दिवाळीपुरती तात्पुरती भाडेवाढ करते. मागील वर्षीच्या दिवाळीत महामंडळाने 20 ते 25 दिवसांसाठी 10 टक्के भाडेवाढीचे सूत्र अमलात आणले होते. ती त्याआधी 15 ते 20 टक्के इतकी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना दिवाळीमध्ये जादा दराने प्रवास करावा लागतो. या दरवाढीमुळे नियमित तिकीट दरात 100 ते 150 रुपयांपर्यंतची वाढ प्रवाशांना सहन करावी लागते. याबाबत अनेक प्रवाशांनी, संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे; पण एसटी महामंडळाने महसूल वाढीसाठी हा पर्याय निवडला आहे. मात्र, अशी दरवाढ यंदा अद्याप लागू झालेली नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

तिकिटाच्या दरात वाढ केली तर प्रवाशांची नाराजी सरकारला सहन करावी लागणार. याचा मतांवर परिणाम होऊ शकतो. हे गणित लक्षात घेऊन तिकीट दरवाढीचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही. त्यामुळे तिकिटातील दरवाढ यंदा लागू होणार नाही, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे. वास्तविक, दिवाळीच्या 15 दिवस आधी दरवाढ लागू केली जाते; पण दिवाळीला आता दहाच दिवस उरले आहेत. अद्याप दरवाढीचा आदेश महामंडळाने प्रसिद्ध केला नाही. तशा हालचालीही महामंडळात सुरू नाहीत. त्यामुळे यंदाची प्रवाशांची दिवाळी गोड होणार, अशी आशा निर्माण झाली आहे. 

दिवाळीच्या दिवसांत दरवर्षी तिकिटांच्या दरात तात्पुरती वाढ केली जाते; पण यंदा अद्याप तशा प्रकारच्या सूचना महामंडळाच्या मुख्य कार्यालयाकडून आम्हाला आलेल्या नाहीत. त्यामुळे तिकीट दर पूर्वीसारखेच आहेत. त्यात कसलाही बदल झालेला नाही. 
- सचिन क्षीरसागर, 
विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no seasonal increase in ST ticket rates yet