औरंगाबादेत वातावरण शांत : अफवांवर विश्वास ठेवू नका

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : शहरात काहीही गडबड नाही. सगळीकडे वातावरण शांत आहे. पोलिसांनी नागरिकांवर कलम १४४ किंवा कुठलेही निर्बंध लादलेले नाहीत, असे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. काही माध्यमांद्वारे चुकीच्या आणि खोडसाळ बातम्या प्रसारित झाल्यामुळे शहरात पसरलेल्या भीतीच्या वातावरणावर खुद्द पोलिस आयुक्तांनीच आता पडदा टाकला आहे. 

औरंगाबाद शहरात सध्या कुठेही काहीही गडबड झाली नाही. मात्र, शहराला दंग्याधोप्याचा इतिहास असल्यामुळे अशा काही बातम्या किंवा अफवा कानी पडल्या, तर येथील नागरिकांचा चटकन विश्वास बसत असून, भीतीचे वातावरण पसरत आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात एमआयएमसह विविध मुस्लिम संघटनांतर्फे शुक्रवारी (ता. २०) भव्य मोर्चा काढण्यात आला होता पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत निघालेल्या आक्रमक मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, यामुळे शहरात चर्चांना उधाण येण्याबरोबरच अफवांचेही चांगलेच पीक आले. परंतु, पोलिसांनी कुठलेही निर्बंध लादले नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

मोर्चा शांततेत झाला होता

मोर्चाच्या अनुषंगाने आझाद चौकामध्ये सकाळपासून क्‍यूआरटी पथकांसह शस्त्रधारी पोलिस सर्व सुरक्षा साधनांसह पोलिसांचा मोठा ताफा सज्ज ठेवण्यात आला होता. दुसरीकडे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातही मोठा बंदोबस्त होता. पोलिसांच्या फिक्‍स पॉइंटसह फिरते पथक आणि साध्या वेषातील पोलिसांची मोर्चावर करडी नजर होती.

तीन उपायुक्त, चार सहायक आयुक्त, चौदा निरीक्षक, पंचेचाळीस सहायक व पोलिस उपनिरीक्षकांसह एकूण साडेपाचशेच्या आसपास अधिकारी, कर्मचारी तैनात होते. कोणताही अनुचित प्रकार यादरम्यान घडला नाही. पयामे इन्सानियतर्फे मोर्चा संपल्यानंतर पोलिसांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे आभार मानले. एरव्ही पोलिसांच्या विरोधात भूमिका घेण्याचा मोर्चेकऱ्यांचा अनुभव पोलिसांना आहे. मात्र गुलाबपुष्प मिळाल्यानंतर पोलिसही भारावून गेले होते.

शहरात कलम १४४ अजिबात लागू नाही. वातावरण अगदी शांत आणि चांगले आहे. कुठेही काहीही गडबड नाही. काही दिवसांपूर्वी फक्त सोशल मीडियावर जातीय, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी केवळ एक नोटीस काढली होती. त्या पलिकडे आपण काहीही निर्बंध लादलेले नाहीत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. 
- चिरंजीव प्रसाद, पोलिस आयुक्त, औरंगाबाद. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com