लातुरकरांवर पाण्याचे संकट, महापालिकेकडे वीजबिलासाठी पैसे नाही

Latur Municipal Corporation News
Latur Municipal Corporation News

लातूर, ता.२३ ः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची महावितरणने वीज तोडून सहा दिवस होऊन गेले आहेत. तरी देखील महापालिकेने वीजबील भरलेले नाही. सध्या महापालिकेतील सत्ताधारी कर माफीत मश्गुल आहेत, तर सक्षम विरोधी पक्षच नसल्याने त्याचा फटका लातूरकरांना बसत आहे. या वर्षी दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात आता वीज तोडल्याने पाणी पुरवठ्याची अनिश्चितता निर्माण झाली आहे. यात सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे. त्याला आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.


लातूर शहराला मांजरा धरणातून तसेच नागझरी, साई बॅरेजेसमधून पाणीपुरवठा केला जात आहे. या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाला नाही. त्यामुळे पावसाळ्यात धरणात फारसे पाणी आले नाही. पण परतीच्या पावसात थोडासा दिलासा मिळाला. यात धरणात तसेच नागझरी व साई बॅरेजेसमध्ये पाणी आले. हे पाणी आले नसते तर लातूरला पुन्हा एकदा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार होती. पण परतीच्या पावसात धरणात पाणी आले. याचा परिणाम शहराला दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात सहा दिवसापूर्वी महावितरणने वीज बीलासाठी हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रे, नागझरी, साई बॅरेजेस येथील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा तोडला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठाच बंद झाला आहे. याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.


काँग्रेसकडून भाजपवर खापर
महापालिकेच्या आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे. याला गेल्या अडीच वर्षातील भाजपची सत्ताच कारणीभूत असल्याचे खापर सध्याचे महापालिकेतील काँग्रेसचे सत्ताधारी फोडत आहेत. त्यात मालमत्ता करमाफीत सध्या ते मश्गुल आहेत. महापालिकेकडे पैसे नाहीत असे सांगत त्यांनी हात झटकले आहेत. याकडे हात झटकण्य़ापेक्षा सत्ताधाऱयांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

विरोधी पक्ष बसला शांत
महापालिकेत बहुमत असूनही भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष झाला आहे. शहराला पंधरा दिवसांपासून पाणी नाही हे पाहून भाजपने आक्रमक होण्याची गरज आहे. पण महापालिकेत हा पक्ष सध्या शांत बसल्याचे चित्र आहे. पाणी प्रश्नाकडे हा पक्ष देखील गांभिर्याने पाहत नसल्याचेच चित्र दिसत आहे.


वेठीस धरण्याचा प्रयत्न
खरे तर वीज तोडण्याची ही पहिली वेळ नाही. पण आतापर्यंत काही बील भरले की एक दोन दिवसात वीज पुरवठा सुरू केला जात होता. पण यावेळेस मात्र सहा दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्याचा परिणाम पंधरा दिवसापेक्षा अधिक काळ पाणी पुरवठ्याला झाला आहे. याच्या झळा लातूरकरांना पोचत आहेत. लातूरकरांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. तातडीने पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी होत आहे.


महापालिकेकडून दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. त्यात वीज तोडल्याने पाणी येणेच बंद झाले आहे. आता जरी पाणी आले तरी पंधरा सोळा दिवसांपेक्षा अधिक कालावधी होणार आहे. विंधनविहिरीचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पाण्यासाठी अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. टँकरद्वारे पाणी खरेदी करावे लागत आहे.
- स्वाती कोरे, वैभवनगर, लातूर

आमच्या भागात पंधरा दिवसातून एकदा पाणी येते. त्यात सुरवातीला तर गटारीचे घाण पाणी असते. त्यात आता तर पाणीच येणे बंद झाले आहे. त्यामुळे दूरवरून सार्वजनिक विंधनविहीरीवरील पाणी आणावे लागत आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरात येत नाही. त्यामुळे महापालिकेने लवकर नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.
- आदिनाथ जाधव, कोल्हेनगर, लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com