सुपारी वीस हजाराची अन् दंड अकरा हजाराचा, आरटीओचा बॅण्ड पथकाच्या पोटावर पाय

हरी तुगावकर
Thursday, 10 December 2020

लातूर येथील आरटीओ कार्यालयाच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून वसुली मोहिमच सुरु केली आहे.

लातूर : येथील आरटीओ कार्यालयाच्या पथकाने गेल्या काही दिवसापासून वसुली मोहिमच सुरु केली आहे. यात शेतकरी तसेच गरीब वाहनधारकांना लक्ष्य केले जात आहे. हजारोचा दंड आकारून एक प्रकारे त्यांची लूटच केली जात आहे. लातूरमध्ये एका लग्नाची वीस हजार रुपयांची सुपारी घेतलेल्या एका बॅण्ड पथकाला या पथकाने अकरा हजार रुपयांचा दंड आकारला आहे. या पथकाकडून दंड तर आकारले जातच आहेत, पण वाहने देखील अडवून ठेवण्याचे प्रकार होत आहेत. कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन होते. त्यामुळे आरटीओ कार्यालयाची झोळी रिकामीच राहिली होती. गेल्या एक दोन महिन्यापासून सर्वच व्यवहार सुरळीत होवू लागले आहेत.

कोरोनामुळे आर्थिक संकटाशी सामना करत असलेले सर्वच घटक उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत. लहान लहान व्यवसायिक तर अजूनही आर्थिक संकटाशी सामना करीत आहेत. असे असताना आरटीओचे पथक मात्र वसुलीच्या मागे लागले आहे. गेल्या काही दिवसापासून शहराच्या बाहेर प्रमुख रस्त्यावर हे पथक उभारत आहेत. आपल्या नेहमीच्या ग्राहकांना सोडून देवून लहान लहान वाहनधारकांना लक्ष्य केले जात आहे. वाहने अडवली जात आहेत. अगोदर बोलणी झाल्यानंतर त्यात काही हाती आले नाही तर मात्र परवाना, विमा, अतिभारमान, पीयूसी प्रमाणपत्र नसणे अशा अनेक प्रकारचा दंड आकारला जात आहे.

दोन दिवसापूर्वी तर एक बॅण्ड पथकावरच या पथकाने कारवाई केली आहे. कोरोनामुळे आधीच बॅण्डवाल्यांचा व्यवसायच बसला आहे. स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे या बॅण्डवाल्यांना महाग झाले होते. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. हाती काही तरी पडेल या आशेने हे बॅण्डवाले वणवण फिरत आहेत. अशाच एका बॅण्डपथकाने एका लग्नाची वीस हजार रुपयाची सुपारी घेतली होती. या बॅण्डवाल्याच्या वाहनावर आरटीओच्या पथकाची नजर गेली. वेगवेगळ्या प्रकारे ११ हजार रुपयाचा दंड या वाहनाला आकारण्यात आला. त्यांचे वाहनही सोडले नाही. एक प्रकारे बॅण्डवाल्यांच्या पोटावर या पथकाने पाय देण्याचाच प्रयत्न केला आहे. शहरात मोठ्या फॅक्टरी, कारखाने, कंपन्या आहेत. त्यांची वाहने राजरोसपणे सोडून देवून हे पथक मात्र गरीबांच्या वाहनावर धाडी घालत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTO Collect Extra Charges From Marriage Band Squad Latur News