परभणी महापालिकेकडून मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेसना नोटीसा 

गणेश पांडे 
Wednesday, 17 February 2021

मंगल कार्यलये, कोचिंग क्लासेसना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरु झाली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

परभणी ः विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्हीसीमध्ये घेतल्या झाडाझडतीची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून असून महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. मंगल कार्यलये, कोचिंग क्लासेसना नोटीसा बजावण्याची कारवाई सुरु झाली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. 

विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी मराठवाड्यात कोरोना प्रतिबंधक योजनांची जिल्हा प्रशासन, महापालिका, नगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रशासन कशा पध्दतीने काम करीत असल्याचे उघड केले आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेला तर प्रचंड कानपिचक्या दिल्या असून कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कारभारावर प्रचंड ताशेरे ओढले असून सक्तीने उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कमी होणाऱ्या चाचण्या याबद्दल देखील श्री. केंद्रेकर यांनी खंत व्यक्त केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे लग्मसमारंभात होणाऱ्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त करुन संबंधीतांना नोटीसा देण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील दिले आहे. 

हेही वाचा - गहू, हरभरासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

कोरोना सुरक्षा नियमांची पायमल्ली 
कोरोना रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी गाईडलाईन दिल्या आहेत. परंतू, या सुरक्षा नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दीवर नियंत्रणासाठी कुठलीही यंत्रणा नाही. कोरोना संपल्याचे समजून मास्कचा वापर अतिशय कमी झाला आहे, त्यांना रोखणारे कुणी नाही, मंगल कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. तेथे कुणाचेही नियंत्रण नाही. कोचिंग क्लासेसची स्थिती देखील वेगळी नाही. त्याचबरोबर चाचण्यांची संख्या कमालीची घटलेली असून त्यामुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी दिसत असल्याचे बोलले जाते. शहरातच नव्हे तर खेडोपाडी देखील दोन-तीन हजार लोकांची लग्नाला उपस्थिती असल्याचे बोलले दात आहे. 

हेही वाचा - योगेशच्या नंतर कुटुंबात आई, पत्नी आणि तीन लहान मुली असा परिवार आहे.

नोटीसा बजावण्याचे काम सुरु 
महापालिकेच्या वतीने शहरातील मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस यांना नोटीसा बजावण्याचे काम सुरु केले आहे. तसेच पालिकेची पथके दररोज तेथे जाऊन आढावा घेणार आहेत. गर्दी आढळून आल्यास गुन्हे देखील दाखल केले जाणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क, सुरक्षित अंतर आढळून न आल्यास दंडात्मक कार्यवाही देखील केली जाणार आहे. 
- प्रदीप जगताप, उपायुक्त, महापालिका, परभणी. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आरटीपीआर वाढवण्याचे आरोग्य यंत्रणेला आदेश 
परभणी ः कोरोना संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून जिल्ह्यात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी, गर्दीच्या ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी आरोग्य यंत्रणेला बजावले आहेत. बी.रघुनाथ सभागृहात बुधवारी (ता.१७) जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची बैठक घेतली. महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गणेश सिरसुलवार, जिल्हा शल्य चिकीत्सक बाळासाहेब नागरगोजे, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांचे वैद्यकीय अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएसशनचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती. या वेळी जिल्हाधिकारी श्री. मुगळीकर यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. घटलेली कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची व आरटीपीसीआर चाचण्यांची संख्येबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून आरोग्य यंत्रणेला फटकारल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली. कोरोना सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी आरटीपीसीआर चाचण्या सुरु कराव्यात, सुरक्षित अंतर व मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करावी, कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या देखील आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात, अशा सूचना देखील त्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice to Mangal Offices, Coaching Classes from Parbhani Municipal Corporation parbhani corona news