esakal | आता चिकन, मटणही घरपोच

बोलून बातमी शोधा

File photo

उस्मानाबादेत अन्नपूर्णा संस्थेच्या माध्यमातून गरजूंना घरपोच शाकाहारी जेवणाचा डबा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

आता चिकन, मटणही घरपोच
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असली तरी शहरातील नागरिकांना आता चिकन, मटणही घरपोच देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, अन्नपूर्णा संस्थेच्या माध्यमातून गरजूंना घरपोच शाकाहारी जेवणाचा डबा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
कोरोना फैलाव रोखण्यासाठी पालिकेने कंबर कसली आहे. शहरातील नागरिकांनी संचारबंदीच्या काळात घराबाहेर पडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. पालिकेने शहरातील सर्वच नागरिकांना घरपोच किराणा, भाजीपाला देण्याचे नियोजन केल्यानंतर आता मटण, चिकनही घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पुरवठादारांचे अर्ज मागविले 
भाजीपाला, किराणा मालाचा पुरवठा करण्याचे नियोजन केल्यानंतर रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास मदत होत आहे. आता चिकन, मटण विक्रेत्यांना ओखळपत्र दिले जाणार आहे. त्यांच्याकडून अर्ज मागविले आहेत. नागरिकांना संबंधित चिकन, मटण विक्रेत्यांचे मोबाईल क्रमांक फेसबुक, व्हॅाट्सॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्यांनी संबंधित विक्रेत्यांना आदेश देऊन आपल्या जिभेची हौस पूर्ण करता येणार आहे. संचारबंदीच्या काळात विक्रेते आणि ग्राहकांची सोय व्हावी, यासाठी पालिकेने हा एक नवीन उपक्रम सुरू केला असून, किती लोक आता यावरून खरेदीची ऑर्डर देतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट - साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

गरजूंना मोफत शाकाहारी जेवण 
जिल्हा रुग्णालयासमोरील भागात अन्नपूर्णा संस्थेच्या माध्यमातून दररोज अन्नदान केले जाते. अनेक गरजू नागरिक भूक भागविण्यासाठी येत असतात. संचारबंदी सुरू असल्याने गरजू नागरिकांना संस्थेच्या मोफत जेवणाचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे अन्नपूर्णा संस्थेनेही यावर उपाययोजना केली आहे. ज्या नागरिकांना जेवणाची गरज आहे. संचारबंदीमुळे ज्यांची जेवणाची सोय होत नाही. अशा गरजूंना मोफत जेवण देण्यासाठी डब्याची सोय केली आहे. शहराच्या सुजाण बांधवांनी त्यांच्या भागात असलेल्या गरजू नागरिकांची मागणी पाहून अन्नपूर्णा संस्थेच्या कार्यकर्त्यांना फोनद्वारे संपर्क करायचा आहे. त्यांच्या आठ कार्यकर्त्यांचे मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर देण्यात आले आहेत. 

कोरोनामुळे चिकनचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात संचारबंदी लागू झाल्याने चिकनची दुकाने बंद असून, इच्छुकांना मिळत नाही. यामध्ये शेतकरी, विक्रेते यांचे नुकसान होत आहे. यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न पालिकेने केला असून, गरजूपर्यंत ही सेवा देत आहोत. 
- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद