
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ नगरपालिका प्रशासनाकडून नियमावली तयार केली आहे. शहरातील गर्दी टाळण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असताना नागरिक नियमांचे उल्लंघन करित असल्याचे चित्र होते. त्यामुळे बुधवारी जिल्हाभरात कारवाईची मोहीम राबवित पालिकांनी अनेकांना दंडात्मक दणका दिला आहे.
हिंगोली : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ नगरपालिका प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या ११२ जणांवर बुधवारी (ता. २२) दंडात्मक कारवाई करण्यात आली.
हिंगोली नगरपालिकेने शहरात कारवाईची मोहीम राबविली. यात सामाजिक सुरक्षित अंतर न ठेवणे याबद्दल ३४ नागरिकांकडून सात हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. चेहऱ्याला मास्क, रुमाल न लावणाऱ्या ३७ नगारिकांकडून १८ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा- धक्कादायक ब्रेकिंग : मालेगावच्या बंदोबस्ताहून परतलेल्या हिंगोलीच्या सहा जवानांना कोरोना
५७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल
तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडून एक हजार रुपये, किराणा दुकानावर दरपत्रक न लावणाऱ्या सहा दुकानदारांकडून ३० हजारांचा दंड आकारण्यात आहे. या कारवाईतून ५७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रामदास पाटील यांच्या पथकाची कारवाई
मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख डी. पी. शिंदे, सहायक पंडित मस्के, विनय साहू, संदीप घुगे, गजानन आठवले, विजय इंगोले, शेख साजिद आदींनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून कारवाईनंतर नियमांचे पालन होत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
कळमनुरीत नऊ जणांवर कारवाई
कळमनुरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नगरपालिका प्रशासनाकडून पावले उचलली आहेत. दिवसाआड भाजी मार्केट, किराणा दुकाने व इतर काही ठराविक आस्थापनांना मोकळीक देण्यात आली आहे. येथे गर्दी होणार नाही, यासाठी पालिका प्रशासनाकडून नियमावली देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, तोंडाला मास्क बांधणे, सुरक्षित अंतरासाठी मार्किंग करणे, भाव फलक लावणे आदी नियम बंधनकारक करण्यात आले आहेत.
शहरातून केली पाहणी
दरम्यान बुधवारी (ता.२२) नगरपालिका कर्मचारी मोहम्मद जाकीर, गंगाधर वाघ, अब्दुल आलीम, राजू साळवे, मोहम्मद नदीम, मनोज नकवाल, गजानन इंगळे यांच्या पथकाने पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांच्यासमवेत शहरातून पाहणी केली.
निर्जंतुकीकरण कक्ष केला तयार
या वेळी दुकानासमोर मार्किंग न केलेल्या चार व्यापारी व तोंडाला मास्क न बांधणारे पाच नागरिक या पथकाला आढळून आले. या नऊ नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून नऊ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. दरम्यान, येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर भरविण्यात येणाऱ्या भाजी मार्केटमध्ये व्यापारी व ग्राहकांसाठी पालिकेकडून निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे.
औंढा येथे नऊ हजारांचा दंड वसूल
औंढा नागनाथ : मास्क न वापरणे, तसेच सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या २५ जणांविरुद्ध बुधवारी औंढा नगरपंचायतीने दंडात्मक कारवाई केली आहे. सोमवारपासून किराणा, भाजीपाला, दूध विक्री दुकाने, चिकन, मटन शॉप, बेकरी ही दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.
येथे क्लिक करा - हिंगोलीत लॉकडाउनमुळे फुलशेती कोमेजली
२५ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई
यावेळी काही जण सोशल डिस्टन्सचे पालन करत नसल्याचे आढळून आले. तसेच काही नागरिकांनी तोंडाला मास्क लावलेले नव्हते. त्यामुळे अशा २५ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून आठ हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलिस प्रशासनाचेही सहकार्य
ही कारवाई मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, रामभाऊ मुळे, अविनाश चव्हाण, विजय महामुने, महादेव बळवंते, उत्तम जाधव, हरिहर गवळी, गंगाप्रसाद बुरकुले, श्री. नागरे, विष्णू रणखांबे, राज गोरे, सतीश रणखांबे, मंजुषा जाधव, राधा काळे, नंदा अंभोरे, नलिनी नलमवार, लतिफ काजी आदींच्या पथकाने केली. पोलिस प्रशासनानेही त्यांना सहकार्य केले.