उस्मानाबाद जिल्ह्यात अनेकजण ऐनवेळी निवडणूक रिंगणात, ऑफलाइन अर्जामुळे अडचण दूर

तानाजी जाधवर
Wednesday, 30 December 2020

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. शेवटच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज भरण्याचे आदेश दिल्याने उमेदवारांची मोठी अडचण दूर झाली होती.

उस्मानाबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून आले. शेवटच्या दिवशी पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाइन अर्ज भरण्याचे आदेश दिल्याने उमेदवारांची मोठी अडचण दूर झाली होती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी ऐनवेळी अगदी काही तासामध्ये हा अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याचे दिसून आले. त्यातही बऱ्याच जणांना प्रक्रियेतील कागदपत्रे जमा करताना शेवटपर्यंत काही त्रुटी आढळून आल्याने अर्ज भरणेही शक्य झाले नाही.

 

 

 
 

ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीसाठी बुधवारपर्यंत (ता.२९) उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. तहसिल कार्यालयात अधिकारी व त्यांचे सहायक हे काम पाहत होते,अर्ज भरताना मोठ्या प्रमाणावर त्रुटी निघत असल्याचे पाहून अनेकजणांनी शेवटी वकिलांच्या मार्फत अर्ज पहिल्यांदा व्यवस्थित भरून घेतल्यानंतरच भरण्यासाठी आणला.त्यातही तहसीलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अत्यंत चांगले नियोजन केल्याचे दिसून आले. अर्जामध्ये कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे,याची कल्पना त्यांनी देऊन पुन्हा एकदा संधी दिली.शिवाय अनेकांच्या सह्या राहिलेल्या असतील त्यासुध्दा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागेवरच करून घेतल्याने अर्ज बाद होण्याचा धोका टळल्याचेही पाहायला मिळाले.

 

 

गेल्या काही दिवसांपासुन नेट कॅफे, ई सेवा केंद्र आदी ठिकाणी असलेल्या गर्दीचा लोंढा दिवसभर तहसील कार्यालयामध्ये दिसून आला. तहसिल कार्यालयात गर्दी झाल्याने कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र होते. इच्छुकांच्या तर ध्यानी मनीही नव्हते, त्याचे अर्ज व त्रुटी याकडेच लक्ष असल्याचे दिसून आले.सकाळी अगदी आठ वाजल्यापासून तहसीलच्या समोर गाड्याची रांग लागायला सुरुवात झाली होती. उत्साही कार्यकर्ते तहसिल कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असल्याचे दिसत असल्याने पोलिसांनी अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला.

 

गर्दी दरम्यान मोठ्या प्रमाणात कोविडबाबत घालून दिलेले नियम पायदळी तुडवले गेले. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वरवर अतिशय सोपी वाटत असली तरी त्यातील बारकावे पाहून भल्या भल्याना घाम फुटला होता. रात्र रात्र जागून अनेकांनी अर्ज भरून घेतल्यानंतर शासनाने शेवटच्या दिवशी ऑफलाइनची सोय उपलब्ध करून दिल्याने केलेली मेहनत वाया गेल्याची भावना व्यक्त होत होत्या. ऑफलाइन करण्याची गरज होती,तर त्याचा अवलंब पहिल्या दिवशी केला असता उमेदवारांचा खर्च,वेळ,मेहनत अशी वाया गेली नसल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांकडून व्यक्त होत आहेत.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Number Of Nominations Filed For Grampanchayat Osmanabad News