परिचारिकांनाच मिळेना आरोग्यविम्याचे संरक्षण!

राजेभाऊ मोगल
शुक्रवार, 12 मे 2017

बंधपत्रित परिचारिकांना कायम सेवेत सामावून घ्यावे, विनाकारण बदली करू नये, प्रशिक्षणासाठी पैसे घेतले जाऊ नयेत यासह अन्य मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षच केले गेले. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात परिचारिकांच्या प्रश्‍नांवर ऊहापोह केला जाईल.
- अनुराधा आठवले, अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन

औरंगाबाद - रुग्णसेवेचे व्रत घेतलेल्या, डॉक्‍टर आणि रुग्ण यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या शासकीय रुग्णालयांतील परिचारिकांच्याच आरोग्याची हेळसांड सुरू असल्याचे ऐकून आश्‍चर्य वाटत असले तरी ते वास्तव आहे. विशेष म्हणजे आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करूनही त्यांना आरोग्य विम्याचे संरक्षणही अद्याप मिळू शकलेले नाही. याशिवाय त्यांच्या इतर समस्या आहेत, त्या वेगळ्याच.

रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाची योग्य काळजी घेणे कर्तव्य माणून परिचारिका सेवा देतात. डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतरची पुढील ट्रीटमेंट परिचारिकाच पूर्ण करतात. अशावेळी संसर्ग किंवा अन्य कारणांनी या घटकांनाही आजार जडण्याची शक्‍यता असते, असे डॉक्‍टरच सांगतात. क्षयरोग, स्वाईन फ्लूची किंवा संसर्गजन्य आजारांची लागण झालेल्या रुग्णांची काळजी घेताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणारे कुठलेच संरक्षण परिचारिकांना नाही. त्यामुळे इतरांसाठी सेवा देत असताना आपले काय, आम्हीच आजारी पडलो किंवा गंभीर आजार झाला तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा केला. आरोग्यविम्याचे संरक्षण मिळावे, यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडे परिचारिकांच्या संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे काहींनी सांगितले.

बदल्यांचा प्रश्‍न
विनंतीविना बदल्या करू नयेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केल्यानंतरही राज्यातील अनेक परिचारिकांच्या बदल्या झाल्या आहेत. कुठलीही पूर्वकल्पना न देता शासनाकडून बदल्या केल्या जातात, असे प्रकार थांबावेत, अशी परिचारिकांची अपेक्षा आहे.

अधिक वेळ सेवा
प्रत्येक ठिकाणी परिचारिकांना आठ तासांहून अधिक वेळ सेवा बजावावी लागते. कामाच्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाइकांसह अन्य घटकांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची भावना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काही परिचारिकांनी व्यक्‍त केली.

बंधपत्रित परिचारिकांना कायम सेवेत सामावून घ्यावे, विनाकारण बदली करू नये, प्रशिक्षणासाठी पैसे घेतले जाऊ नयेत यासह अन्य मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्षच केले गेले. पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात परिचारिकांच्या प्रश्‍नांवर ऊहापोह केला जाईल.
- अनुराधा आठवले, अध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशन

Web Title: Nurses deprived of life insurance