नर्सिंग प्रवेशाच्या नावाखाली ३९ विद्यार्थिनींची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

पोलिसांनी लावले कुलूप
संस्थेच्या कार्यालयात एक लिपिक महिला होती. शिवाय कोणीही नव्हते. त्यामुळे आक्रमक पालक आणि विद्यार्थिनींची समजूत काढत वेदांतनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्यासह सिटी चौक आरपीएफ तुकडीने कार्यालयाला कुलूप लावले. त्यानंतर विद्यार्थिनी व पालक वेदांतनगर ठाण्याकडे रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

औरंगाबाद - क्रांती चौक परिसरातील जनहित नर्सिंग महाविद्यालयात जीएनएम नर्सिंगसाठी प्रवेश घेतलेल्या ३९ हून अधिक विद्यार्थिनींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. मंगळवारी (ता. नऊ) परीक्षा सुरू होणार असताना सोमवारी उशिरापर्यंत हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थिनींनी महाविद्यालयात रात्री दहापर्यंत ठिय्या दिला. त्यानंतर विद्यार्थिनी, पालकांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले.

विद्यार्थिनींनी दिलेल्या माहितीनुसार, जनहित शिक्षण प्रसारक मंडळ संचालित, जनहित नर्सिंग महाविद्यालयात मागील दोन वर्षांपासून प्रवेश घेतला. पहिल्या वर्षी प्रवेशाला उशीर झाला म्हणून संस्थाचालक सुभाष पाटील नावाच्या व्यक्तीने पुढील वर्षी तुमचे प्रवेश करून देता येईल, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून ४० हून अधिक विद्यार्थिनींनी दोन वर्षांपूर्वी प्रवेश घेतला. ही संख्या मोठी असू शकते. त्यातील प्रत्येकीने १० ते ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम भरली. ज्यांच्याकडे पैसे बाकी होते, त्यांना सोमवारी दुपारपर्यंत पैसे घेऊन येण्याचे संस्थेकडून सांगण्यात येत होते. मात्र सोमवारी उशिरापर्यंत हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थिनींनी थेट सुभाष पाटील यांना फोन लावला. त्यांना दोन दिवसांनी हॉलतिकीट मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी विद्यार्थिनींना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे विद्यार्थिनी रडू लागल्या, तर अनेकींनी कर्ज काढून पैसे भरले. त्यांनी डोक्‍याला हात लावत पश्‍चात्ताप केला. मात्र, संस्थेकडे प्रवेशावेळी जमा केलेल्या ओरिजनल कागदपत्रांविषयी अनेकींनी चिंता व्यक्त केली. 

विद्यार्थी संघटना मदतीला 
घटनेची माहिती मिळताच युवा सेनेचे राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, मिथुन व्यास, नारायण सुरे, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी महाविद्यालयात धाव घेतली. यावेळी जंजाळ यांनी संस्थाचालकाशी फोनवरून संपर्क साधत विद्यार्थ्यांना कागदपत्रे व पैसे परत मिळवून देण्याच्या मदतीचे आश्वासन दिले. तर पोलिस आयुक्तांना भेटून बोगस संस्थेच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, युवा सेनेने विद्यार्थिनींसाठी पाणी-नाश्‍त्याची व्यवस्था केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nursing Admission Student Cheating Crime