दोन डाॅक्टरांसह चौघांवर गुन्हा, गर्भपातानंतर मृत्यूचे प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

लपून-छपून गर्भपात करणाऱ्यांचे आणखी एक पितळ उघडे पडले असून, गर्भपातावेळी अर्धवट प्रक्रियेमुळे रक्तस्राव वाढला. उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू अर्धवट गर्भपातामुळे झाल्याचे अहवालानंतर उघडकीस आले. तत्पूर्वी अर्भकाची विल्हेवाटही लावल्याचे तपासातून समोर आले. या प्रकरणी संशयित डॉक्‍टर व मृत महिलेच्या पती, सासऱ्याविरुद्ध मंगळवारी (ता. सहा) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

औरंगाबाद - लपून-छपून गर्भपात करणाऱ्यांचे आणखी एक पितळ उघडे पडले असून, गर्भपातावेळी अर्धवट प्रक्रियेमुळे रक्तस्राव वाढला. उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू अर्धवट गर्भपातामुळे झाल्याचे अहवालानंतर उघडकीस आले. तत्पूर्वी अर्भकाची विल्हेवाटही लावल्याचे तपासातून समोर आले. या प्रकरणी संशयित डॉक्‍टर व मृत महिलेच्या पती, सासऱ्याविरुद्ध मंगळवारी (ता. सहा) पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, डॉ. राणा, डॉ. गजानन शेळके, महिलेचा पती रमेश अंगत शेप, सासरा अंगत धोंडिबा शेप अशी संशयितांची नावे आहेत. यातील डॉ. राणा उस्मानपुराऱ्यातील गर्भपात प्रकरणात संशयित आहे. या प्रकरणात सहायक फौजदार दत्तात्रय बोटके यांनी तक्रार दिली. त्यानुसार, अंबाजोगाई जिल्ह्यातील सारिका रमेश शेप यांनी 21 जुलै 2017 ला बीडबायपास भागातील एका रुग्णालयात रमेश शेप व डॉ. गजानन शेळके यांनी भरती केले होते; परंतु तिचा मृत्यू झाला. याबाबत एमएलसीही 22 जुलै 2017 ला नोंदविण्यात आली. या प्रकरणात सहायक फौजदार दत्तात्रय बोटके यांनी तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी नातेवाइकांचे जबाब घेतले असता या महिला गर्भवती असल्याने चक्कर येत होती, अशी माहिती दिली होती. दरम्यान, महिलेची उत्तरीय तपासणी झाली. डॉक्‍टरांनी मृत्यूचे कारण जाणण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवला व हिस्टोपॅथचे नमुने हिस्टोपॅथ विभागात तपासणीसाठी पाठविले होते. 
 
अर्भकाची विल्हेवाट 
मृत महिला गर्भवती होती ही बाब पती रमेश व सासरा अंगत यांना माहीत होती. तरीही डॉ. राणा, डॉ. गजानन शेळके, एक महिला व इतर काहींनी महिलेच्या गर्भपाताचा प्रयत्न केला. ही प्रक्रिया अर्धवट राहिल्याने रक्तस्राव वाढला. तिच्या गर्भपाताचे कारण लपवून संशयितांनी तिला बीडबायपास येथील रुग्णालयात भरती केले. तत्पूर्वी अर्भकाची विल्हेवाट लावून त्यांनी पुरावा नष्ट केला, असे तपासातून निष्पन्न झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 
 
काय आला वैद्यकीय अहवाल? 
महिलेच्या मृत्यूच्या कारणांबाबत घाटी रुग्णालयाच्या हिस्टोपॅथ विभागाने 11 जूनला अंतिम तपासणी अहवाल पोलिसांना दिला. त्यात गर्भपाताची अर्धवट प्रक्रिया झाल्याने मृत्यू ओढावल्याचे नमूद केले. अर्धवट गर्भपातानंतर 21 जुलै 2017 ला उपचारासाठी महिलेला एका रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यादिवशीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी तपासून जबाब नोंदविले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offense against two doctors