Babanrao Lonikar jalna
Babanrao Lonikar jalna

आपल्या तहसीलदार मॅडम हिराॅईनसारख्याच दिसतात - बबनराव लोणीकरांचे आक्षेपार्ह वक्तव्य

जालना : नेहमीच वेगवेगळ्या विधानावरुन चर्चेत असणारे भाजपा नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी पून्हा एकदा भर कार्यक्रमातच महिला तहसीलदाराविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. लोणीकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या मोर्चा काढू, त्यासाठी गर्दी जमविण्यासाठी एखादी हिराॅईन आणू . ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी व्यासपीठावर बसलेल्या तहसीलदार या सुद्धा हिराईनसारख्याच दिसतात असेही वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे लोणीकरांवर टीकेची झोड उठली असून विरोधकही आक्रमक झाले आहेत.

परतूर तालूक्यातील (जि. जालना) येथील एका गावातील वीज केंद्राचे उद्धाटन करण्यासाठी आलेल्या लोणीकर यांची जीभ घसरली आहे.   लोणीकरांच्या भाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून ती सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरलही झाली आहे.  त्यांच्या या वक्तव्यावरुन शेतकरी प्रश्न त्यांच्या ठायी किती गंभीर आहे हे दिसून येत असल्याची टीका समाजमाध्यमातून व्यक्त होत आहे. या क्लिपसंदर्भात बोलताना लोणीकर यांनी सदर क्लिप आपलीच असल्याची कबूली देत, या क्लिपमध्ये आक्षेपार्ह काही नसल्याचेही ते म्हणाले आहेत.

लोणीकरांवर टीकेची झोड

मुळात कोण कसं राहतं, कसं दिसतं याचा आपण कशाला विचार करायचा,  बबनराव लोणीकर हे माजी मंत्री राहिलेले आहेत,  महिलेविषयी कसं बोलावं त्यांना कळत नाही,  त्यांच्या तोंडी असं बोलणं शोभत नसल्याचे शिवसेनेचे आमदार तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.  तसेच लोणीकरांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी निषेध करत असल्याचे राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण म्हणाल्या. मुळात मोर्चाला गर्दी जमविण्यासाठी हिराईन आणा, मोर्चा मोठा करा असं म्हणणही चुकीच आहे. मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं यासाठी भाजपाला अजून कोणत्या थराला जायचं आहे कळत नाही. तहसीलदार महिला म्हणूनच नाही, पण कोणत्याही महिलेबाबल असं आक्षेपार्ह वक्तव्य करणं हा विनयभंगाचा गुन्हा असून महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करण्याची गरज असताना असं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचंही श्रीमती चव्हाण यांनी म्हटलं आहे.

तहसीलदार संघटनेने केला निषेध
महिलेविषयी केलेल्या अशा वक्तव्याचा तहसीलदार संघटनेनेही निषेध केला आहे. लोणीकर यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागावी,  तसेच कायद्याच्या अनुषंगाने लोणीकरांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बगळे यांनी म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण आहे तरी काय?

शेतकऱ्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान हवे असेल तर त्यांनी मराठवाड्यातील सर्वात मोठा मोर्चा काढायला हवा. तरच राज्यातील सरकार त्यांना २५ हजार रुपयांचे अनुदान देईल. या मोर्चासाठी मी कुणाला आणू हे तुम्ही सांगा. देवेंद्र फडणवीस यांना आणू का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आणू का? की एखादी हिरोईन आणू? हे मला तुम्हीच सांगा. जर एखादी हिरोईन मिळाली नाही तर आपल्या स्टेजवर बसलेल्या तहसिलदार मॅडम हिरोईनच आहेत. त्याही हिरोईन सारख्याच दिसतात, असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे. व्यासपीठावर त्यांचा मुलगा व जिल्हा परिषद सदस्य राहुल लोणीकर, तहसिलदार मॅडम,  सरपंच बसलेले होते.  लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर तहसिलदार मॅडम स्टेजवरून उठून गेल्या. परंतु, लोणीकर यांना याविषयी काहीच वादग्रस्त वाटले नाही.  आपण जे काही बोललो त्यात काहीच वावगं नाही, असे लोणीकर म्हणत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com