कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

बाबासाहेब गोंटे 
Sunday, 19 April 2020

महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासनात समन्वय ठेवत कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबतच शेतकरी, जनतेची काळजी घेत अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचे तहानभूक हरवत अहोरात्र कार्य सुरू आहे. 

अंबड (जि.जालना) -  महसूल, आरोग्य, पोलिस प्रशासनात समन्वय ठेवत कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबतच शेतकरी, जनतेची काळजी घेत अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांचे तहानभूक हरवत अहोरात्र कार्य सुरू आहे. 

अंबड आणि घनसावंगी अशा विस्ताराने मोठ्या असणाऱ्या तालुक्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांच्याकडे आहे.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

ग्रामीण भागात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महसूलचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग, शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी मदतनीस, आशा वर्कर अशा साऱ्यांच्या साथीने ते प्रभावी उपाययोजना राबवीत आहेत. विलगीकरण कक्षाची स्थापना असो किंवा कोरोनाबाबत सर्वेक्षण, प्रत्येक बाबतीत दोन्ही तालुक्यांत पावले उचलली गेली.

हेही वाचा : त्यांच्या’साठी आता जिल्हाच बनलंय कुटुंब...

र्यक्षेत्रातील शहागड, दुनगाव परिसरात कोरोनाबाधितांच्या संपर्कामुळे खळबळ उडाली होती. रांजणीतील एक शिक्षिका कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रशासनाकडून युद्धपातळीवर हालचाली झाल्या होत्या. संबंधितांचे क्वारंटाइन, गावांत सर्वेक्षण झाले. स्थिती नियंत्रणात राहिली. त्यामुळे ग्रामस्‍थांना मोठा दिलासा मिळाला होता. 

रोजगार देण्याबाबत लक्ष 

विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात गरजवंत भुकेले राहू नयेत म्हणून धान्यवाटप असेल नाही तर नागरिकांच्या मदतीने खाद्यपदार्थांचे वाटप, साऱ्यांबाबत ते जातीने लक्ष ठेवून आहेत. कष्टकरी, मजुरांनी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून रोजगार हमीची कामे सुरू करण्याबाबत त्यांनी नियोजन सुरू केले. दोन्ही तालुक्यांतील यंत्रणेच्या बैठकीत त्यांनी कामे सुरू करण्यासाठी कार्यवाहीच्या सूचना दिल्या. अर्थात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आदींबाबतही सूचना दिल्या. 

दिवसरात्र कामांत व्यस्त 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जणू पायाला भिंगरी लावून शशिकांत हदगल दिवसरात्र कामांत व्यस्त आहेत. महसूल, पोलिस, आरोग्यासह विविध विभागांच्या यंत्रणेला बरोबर घेऊन त्यांची अहोरात्र कामे सुरू आहेत. कुटुंबाला वेळ देणेही सध्या त्यांना शक्य होत नाही. नेहमी वडिलांसोबत गप्पा मारणारे, अभ्यासात मार्गदर्शन घेणारे शैल, श्‍लोक हे सध्याची परिस्थिती समजून घेतात. आपले वडील समाजासाठी, देशासाठी अहोरात्र कार्य करताना पाहून त्यांनाही समाधान वाटते. 

कोरोनाला रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी कार्य करीत आहे. नागरिकांचीही साथ महत्त्वाची आहे. सर्वजणांनी मिळूनच कोरोनाला हरविता येणार आहे, ही खूणगाठ बांधायला हवी. अत्यावश्‍यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंग ठेवावे. मास्कचा वापर करावा. 
- शशिकांत हदगल, 
उपविभागीय अधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officers fight against corona