अरे बापरे, नऊ हजार घरांवर रेड शिक्‍के

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

जिल्ह्यात आतापर्यंत इतर जिल्‍ह्यातून येणाऱ्या ३० हजार २७६ जणांची तपासणी करून त्यांना होम क्‍वारंटाइन केले आहे. बाहेरून येणाऱ्यांचा ओघ सुरूच आहे. जून महिण्यात ही संख्या कमी झाली असून आतापर्यंत दोन हजार ५६३ नागरिक आले आहेत. ते क्‍वांरटाइनमध्ये आहेत.

हिंगोली ः जिल्‍ह्यात नऊ हजार ९२२ घरांवर रेड शिक्‍के मारण्यात आले आहेत. इतर जिल्‍ह्यातून येणाऱ्या व्यक्‍तींची आरोग्य तपासणी केल्यानंतर अशांना होम क्‍वारंटाइन केले जात आहे. ज्या घरात त्‍यांना क्‍वारंटाइन केले त्या घरावर आरोग्य विभागातर्फे रेड शिक्‍के मारले जात आहेत. आजुबाजुच्या शेजाऱ्यांनी त्‍यांच्या घरी न जाण्याच्या सूचना देखील केल्या जात आहेत. औंढा तालुक्‍यात एक हजार १७७, वसमत दोन हजार १२३, हिंगोली दोन हजार ७०, कळमनुरी दोन हजार ३३५, सेनगाव दोन हजार २१७ अशा एकूण जिल्‍ह्यात नऊ हजार ९२२ घरावर रेड शिक्‍के मारण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. लक्षणे आढळून आल्यास त्‍यांना ताबडतोब भरती केले जात आहे. तर काही जणांचे स्‍वॅब नमुने देखील घेतले जात आहेत. ग्रामपंचायत स्‍तरावर देखील बाहेरून आलेल्या व्यक्‍तींना वेगवेगळ्या ठिकाणी क्‍वांरटाइन केले आहे. स्‍थलांतरित होऊन जिल्‍ह्यात आलेल्या व्यक्‍तींना होम क्‍वारंटाइनचे शिक्‍के मारण्यात आले आहेत.

हेही वाचा - एलसीबीची कारवाई, उस्माननगर पोलिसांच्या जिव्हारी -

तालुकानिहाय आलेले नागरिक 
जिल्‍ह्यात (ता.१४) मार्च ते (ता.३१) मार्चपर्यंत ४३ हजार ७८१ नागरिक आले होते. तर जून महिण्यात आतापर्यंत दोन हजार ५६३ नागरिक दाखल झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४६ हजार ३४४ नागरिक स्‍थलांतरीत होऊन दाखल झाले आहेत. यात हिंगोली तालुक्‍यात नऊ हजार ८७२ त्‍यापैकी जून महिण्यात आलेले ३८३, वसमत तालुक्‍यात आठ हजार २९३ त्‍यापैकी जुनमध्ये ४८७, कळमनुरी तालुक्‍यात १२ हजार २०९, त्‍यापैकी जुनमध्ये ९८ नागरिक दाखल झाले आहेत.

हेही वाचा - Video - गोदावरी नदीचे प्रदूषण थांबविणे आहे शक्य, कसे? ते वाचाच

ग्रामस्‍तरीय समिती व आरोग्य विभागाची देखरेख
सेनगाव तालुक्‍यात नऊ हजार ३९३ नागरिकांपैकी जून महिण्यात ३९९ तर औंढा नागनाथ तालुक्‍यात सहा हजार ५७७ नागरिकांपैकी ३१४ नगरिक जून महिण्यात आतापर्यंत आले आहेत. स्‍थलांतरित नागरिकांची आवक सुरूच आहे. जिल्‍ह्यात ३० हजार २७६ व्यक्‍तींना होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. त्‍यापैकी औंढा नागनाथ तालुक्‍यात तीन हजार ४३४, वसमत तालुका पाच हजार ११६, हिंगोली १० हजार ३५२, कळमनुरी सहा हजार २९९, सेनगाव तालुक्‍यात पाच हजार ७५ व्यक्‍ती आतापर्यंत होम क्‍वारंटाइनमध्ये आहेत. ही आकडेवारी (ता.१७) जुनपर्यंतची आहे. होम क्‍वारंटाइन असलेल्याची ग्रामस्‍तरीय समिती व आरोग्य विभागाचे कर्मचारी देखरेख करीत आहेत.

मधुमेह, रक्‍तदाब, कर्करोग रुग्णांची शोध मोहिम
जिल्‍ह्यात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मधुमेह, रक्‍तदाब, कर्करोग, दमा असलेल्या रुग्णांची शोध मोहिम राबविण्यात आली. यात एक लाख १५ हजार २७ जणांनी विविध आजार असल्याचे या मोहिमेत आढळून आले. यात मधुमेह आजार असलेले ३१ हजार ५७१, रक्‍तदाब ६६ हजार ९६८, कर्करोग एक हजार ४८ तर दमा असलेले १५ हजार ४६१ जण आढळून आले आहेत. ३१९ जणांना ताप खोकला तर ३५७ जणांवर आवश्यक उपचार आरोग्य विभागाकडून करण्यात आले असून ही शोध मोहिम जिल्‍ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातून गावनिहाय राबविण्यात आल्याचे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Oh my gosh, red stamps on nine thousand houses, hingoli news