या लोखंडाचे माना आभार...! 

आदित्य वाघमारे - सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक पुलांना मजबुती देण्याचे काम केवळ चुना, गूळ आणि वनस्पती करीत नसत. या पुलांना तीनशे वर्षांचे आयुष्य प्रदान करण्याचे काम यांतील लोखंडी सांगाड्यांनी केले आहे. पुलाची झीज झाल्याने बाहेर आलेल्या या लोखंडाचे आभार महापालिकेसह सर्वांनीच मानायला हवेत! 

औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक पुलांना मजबुती देण्याचे काम केवळ चुना, गूळ आणि वनस्पती करीत नसत. या पुलांना तीनशे वर्षांचे आयुष्य प्रदान करण्याचे काम यांतील लोखंडी सांगाड्यांनी केले आहे. पुलाची झीज झाल्याने बाहेर आलेल्या या लोखंडाचे आभार महापालिकेसह सर्वांनीच मानायला हवेत! 

शहरातील ऐतिहासिक पुलांना डागडुजीपोटी महापालिका आणि शासकीय यंत्रणांनी साधे चुन्याचे बोटही कधी लावलेले नाही. यापूर्वी या पुलांची डागडुजी कधी झाली याचा लेखाजोखा महापालिकेच्या दप्तरात नाही. अशा परिस्थितीत या पुलांनी आपल्या आयुष्याची तीन शतके पूर्ण केली आहेत. या पुलांच्या मजबुतीवर नेहमीच होणाऱ्या चर्चेत दोन दगडांमध्ये वापरण्यात आलेले शिसे, चुना, गूळ, वनस्पतींच्या मिश्रणाला या पुलांच्या मजबुतीचे श्रेय दिले जाते. मात्र, या पुलांना वजनदार वाहतूक झेलण्याचे बळ प्रदान करण्याचे काम आत असलेल्या आणि सहजासहजी दृष्टीस न पडणाऱ्या लोखंडी सांगाड्याने केले आहे. मकईगेट आणि दर्गा पुलाच्या दगडांची झीज अधिक झाल्याने या पुलांमधील असलेल्या लोखंडी सळया आता उघड्या पडायला लागल्या आहेत. या उघड्या सळयांचे विणलेले जाळे या पुलाला आतापर्यंत मजबुती प्रदान करत आले आहेत. 

स्टेपलरसारख्या आडव्या चिपा दगड जोडणाऱ्या 
रोजच्या वापरातील स्टेपलरची पिन जे काम करते, तेच काम या आडव्या लोखंडी चिपा करतात. आजूबाजूला असलेल्या दोन दगडांना छिद्र पाडून या दोन दगडांना एकत्र बांधण्यासाठी ही स्टेपलर पिनच्या आकाराची चिप आत खोचली गेली आहे. ही चीप आत गेली, की त्या छिद्रांमध्ये अडते आणि वरील दगडाच्या दबावाने ती अधिक पक्की बसते. दगडांच्या आडव्या रांगेला मजबुती देण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली आहे. 

दगडांच्या उभ्या रांगामध्ये उभी सळई 
एकावर एक ठेवण्यात येणाऱ्या दगडांना एकत्रित बांधण्यासाठी उभ्या सळईचा वापर करण्यात आला आहे. सगळ्यात वरील दगडापासून शेवटच्या दगडाखाली असलेल्या आणि पाया असलेल्या दगडात ही सळई नेली गेली आहे. दगडांच्या आरपार गेलेल्या या सळयांच्या साथीने ही रांग तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हादरे आणि वजनाचा ताण सहन करण्याची क्षमता या पुलांना मिळाली आहे. 

""ऐतिहासिक पुलांमध्ये वापरण्यात आलेल्या लोखंडी चिपा आणि उभ्या सळया या पुलाला मजबुती देतात; मात्र त्यांनाही वयाची मर्यादा आहेच. सळया उघड्या पडल्या, की त्यांचीही माती व्हायला लागतेच. त्यांच्यावर प्रक्रिया करून पुन्हा बंदिस्त करण्यात आले नाही, तर पुलांचे आयुर्मान झपाट्याने घटणार आहे.'' 
- अजय ठाकूर (ज्येष्ठ वास्तुविशारद) 

Web Title: old bridge in aurangabad