भरधाव हायवाने कुंटुबाला चिरडले! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - बीडबायपास रस्त्यावर धोकादायक रहदारीचे शुक्‍लकाष्ट संपता संपेना. वाळूने खचाखच भरलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली. तिची आई व वडील गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 20) सायंकाळी साडेसहादरम्यान एमआयटी महाविद्यालयासमोरील चौकात घडला. 

औरंगाबाद - बीडबायपास रस्त्यावर धोकादायक रहदारीचे शुक्‍लकाष्ट संपता संपेना. वाळूने खचाखच भरलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला चिरडले. यात दुचाकीवरील तीन वर्षीय चिमुकली जागीच ठार झाली. तिची आई व वडील गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी (ता. 20) सायंकाळी साडेसहादरम्यान एमआयटी महाविद्यालयासमोरील चौकात घडला. 

आरोही अंबादास खिल्लारे (वय तीन) असे मृत मुलीचे नाव आहे. तिची आई ऊर्मिला अंबादास खिल्लारे (वय 25) व वडील अंबादास सखाराम खिल्लारे (वय 30, सर्व रा. साईनगर, सातारा) हे गंभीर जखमी झालेत. अंबादास खिल्लारे मिस्त्री काम करतात. सायंकाळी सहाच्या सुमारास पत्नी, मुलीसह दुचाकीने ते शहानुरमियॉं दर्गा येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी जात होते. बाजारात जाण्यासाठी त्यांनी सासरकडून दुचाकी घेतली. 

अंबादास खिल्लारे सातारा परिसरातून दुचाकीने आरोही व पत्नी ऊर्मिला यांना घेऊन निघाले. एमआयटी महाविद्यालयमार्गे ते बीडबायपास रस्त्यावर येत होते; पण रस्त्यावर सिग्नल लागल्याने त्यांनी दुचाकी थांबविली. त्यावेळी बीड बायपासकडून महानुभव आश्रम चौकाकडे ट्रक येत होता. नियंत्रण सुटलेल्या भरधाव हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला चिरडले. यात मुलगी आरोही चाकाखाली आल्याने जागीच गतप्राण झाली; तर ऊर्मिला यांच्या पायावरून चाक गेले असून, त्यांच्यासह अंबादास गंभीर जखमी झाले. अपघात घडताच, घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन सातारा पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, सर्वांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांवर शर्थीचे उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, चालक भाऊसाहेब खडतन (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) याला अटक केली. निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. अशी माहती सातारा पोलिसांनी दिली. 

चालकाला मारहाण 
अपघातानंतर घटनास्थळावरून चालक पळून जाण्याच्या तयारीत होता; पण संतप्त नागरिकांनी त्याला पकडले आणि मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. 

वाहतूक कोंडी 
भरसिग्नलसमोर अपघात घडल्यामुळे चौकात वाहतूक कोंडी झाली. महानुभव आश्रमाकडे जाणारी वाहतूक मंदावली. अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त दुचाकी बाजूला सारून ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

वजनापेक्षा अधिक वाळू 
वाहनचालक भाऊसाहेब खडसनकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचा गौण खनिज वाहतूक परवाना आहे; पण ट्रकमध्ये तीन ब्रास वाळू साठवणूक व वाहतूक करण्याची परवानगी आहे. असे असतानाही सुमारे सहा ब्रास वाळूचा भरणा ट्रकमध्ये होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: one dead in accident