औरंगाबाद: भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

मनोज साखरे
मंगळवार, 27 मार्च 2018

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय थोरात (वय : 19, रा, कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. बीडबायपास रस्त्याने जाताना त्याची दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे तरुण दुचाकी ढकलत एमआयटीकडून महानुभाव चौकमार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याने कांचनवाडीला  जात होता.

औरंगाबाद : दुचाकी नादुरुस्त झाल्याने ढकलत नेताना मागून भरधाव आलेल्या कारने धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी ढकलत नेणारा तरुण जागीच ठार झाला. हि घटना बीडबायपास रस्त्यावरील एमआयटी ते महानुभाव चौकदरम्यान एका हॉटेलजवळ सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.

सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संजय थोरात (वय : 19, रा, कांचनवाडी) असे मृताचे नाव आहे. बीडबायपास रस्त्याने जाताना त्याची दुचाकी नादुरुस्त झाली. त्यामुळे तरुण दुचाकी ढकलत एमआयटीकडून महानुभाव चौकमार्गे पैठणकडे जाणाऱ्या रस्त्याने कांचनवाडीला  जात होता. याच दरम्यान महानुभाव चौकाकडे भरधाव वेगात कार (एम. एच. 48,  ए. सी.  8935) जात होती. पुढे दुचाकी घेऊन तरुण पायी जात असल्याची बाब कार चालकाला उशिरा लक्षात आली. अचानक दुचाकी व तरुण समोर पाहून चालकाने कार नियंत्रणात आणायचा प्रयत्न केला, परंतु कारची गती एवढी जास्त होती की दुचाकीसह तरुणाला जोरात कार धडकली. यात तरुण जागीच ठार झाला. या घटनेनंतर चालक व आतील काहीजण पसार झाले. अपघाताची बाब समजताच घटनास्थळी परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी अपघाताची माहिती सातारा पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस पोचले त्यांनी कार ताब्यात घेतली असून या घटनेची नोंद सातारा ठाण्यात झाली.

अपघात एवढा भीषण होता की, तरुण डोक्यावर पडून जागीच रक्तबंबाळ झाला तसेच कार व दुचाकी रस्त्यालगत एका दुकानाच्या शटरला धडकल्याने दोन्ही वाहनाचा चेंदामेंदा झाला.

Web Title: one dead in accident aurangabad