भाविकांच्या वाहनाला अपघात, एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

- सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (पिनगाळे) येथील भाविकांच्या वाहनाला माजलगाव जवळ झाला अपघात.

- एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१२) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील बोरखेडी (पिनगाळे) येथील भाविकांच्या वाहनाला माजलगाव जवळ झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 12) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

सेनगाव तालुक्यातील बोरखेडी  पिनगाळे येथील शेषराव पिनगाळे (वय 60)  यांच्यासह प्रल्हाद पिनगाळे, संतोष बाहेती, भारत गडदे, बाळू काळे, देविदास काळे हे भाविक पिकअप व्हॅनने गुरुवारी (ता. 11) सायंकाळी सहा वाजता आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे निघाले होते. त्यांचे  वाहन आज पहाटे एक वाजण्याच्या सुमारास माजलगाव जवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात पिकअप रस्ताच्या खाली जाऊन उलटला. या अपघातात शेषराव पिनगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना माजलगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले.

वाहनातील इतर भाविकांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, मयत पिनगाळे हे परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेमधे व्यवस्थापक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या अपघाताने गावावर शोककळा पसरली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead in a pilgrim vehicle accident