बीड : चोर समजून मारहाणीत एकाचा मृत्यू

निसार शेख
सोमवार, 13 जुलै 2020

फत्तेवडगावात जमावाचे कृत्य, नऊ संशयित ताब्यात 

कडा (जि. बीड) - चोरीच्या उद्देशाने तीन ते चारजण फिरत असल्याच्या संशयातून जमावाने एकाला पकडले आणि बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना फत्तेवडगाव (ता. आष्टी) येथे सोमवारी (ता. १३) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास घडली. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली. 

चोरीच्या उद्देशाने तीन-चार व्यक्ती फिरत असल्याची माहिती फत्तेवडगाव येथील सरपंच रमेश काळे यांनी कडा पोलिस चौकीतील पोलिस शिपाई बंडू किसन दुधाळ यांना मोबाईलद्वारे रात्री दिली. त्याचवेळी काहींनी याची माहिती गावातील इतरांना दिली. चौघांना पकडण्यासाठी जमाव जमला. हकीम नारायण भोसले (वय २६, रा. पुंडीवाहिरा, ता. आष्टी) हा हाती लागताच
जमावाने त्याला बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

उत्तरीय तपासणीनंतर पुंडीवाहिरा येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.  पोलिस शिपाई बंडू दुधाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिभीषण काळे, शत्रुघ्न काळे, परमेश्वर काळे व अन्य वीस ते बावीस संशयितांविरुद्ध अॅट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल झाला. आष्टी पोलिसांनी संशयित म्हणून नऊजणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे तपास करीत आहेत. 
 
अधिकाऱ्यांची धाव 
पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे, स्थानिक गुन्हे शाखेचे भारत राऊत, निरीक्षक माधव सूर्यवंशी, सहायक निरीक्षक सलीम पठाण, उपनिरीक्षक अमित करपे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. 

(संपादन : विकास देशमुख)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One died at Kada District Beed