ट्रक-टॅंकरच्या धडकेत एक जण ठार

संताेष गंगवाल
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारीजवळील खडकी पूल परिसरातील वळणावर डिझेल टॅंकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन टॅंकरचालक जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.

देवगाव रंगारी (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारीजवळील खडकी पूल परिसरातील वळणावर डिझेल टॅंकर व ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन टॅंकरचालक जागीच ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी (ता. 22) सायंकाळी पाचच्या दरम्यान झाला. या भीषण अपघातात टॅंकरच्या केबिनचा चक्काचूर झाला. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक पोलिस व देवगाव रंगारी पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

पानेवाडी मनमाड येथून डिझेल घेऊन औरंगाबादकडे येत असलेले टॅंकर व औरंगाबादकडून येत असलेला ट्रक यांच्यात देवगाव रंगारीजवळ असलेल्या खडकी पुलाजवळील वळणावर मंगळवारी सायंकाळी समोरासमोर धडक झाली. यात अपघातात टॅंकरचालक भगवान समाधान काकळीज (वय 32, रा. तांदुळवाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक) हा केबिनमध्ये चेंगरला होता. त्यास नागरिकांच्या साहाय्याने बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

टॅंकरचा क्‍लीनर समाधान चिंधा यशवंत (26, रा. किन्नड खलाशी, ता. नांदगाव), वाल्मीक सखाराम त्रिभुवन (60, रा. भीमनगर, औरंगाबाद), गणेश शांतीलाल नारळे (32, रा. खरज, ता. वैजापूर) व एक अनोळखी महिला हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.
याबाबत टॅंकरचा क्‍लीनर समाधान यशवंत याच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Died In Truck-Tanker Accident